नांदेड: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं.


खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला. काँग्रेने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून, मोठा विजय मिळवला.

नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल 

  • काँग्रेस - 73

  • भाजप - 06

  • एमआयएम - 00

  • शिवसेना - 01

  • अपक्ष/इतर - 01


नांदेड वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची यादी



व्हीव्हीपॅट मशीनमुळे निकाल लांबला

दरम्यान, या निवडणुकीत प्रभाग 2 मध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या प्रभागाचा निकाल लागला नव्हता. 81 जागांपैकी 77 जागांची मतमोजणी संध्याकाळी 5 पर्यंतच झाली होती, मात्र शेवटच्या 4 जागांचा निकाल लागण्यासाठी मध्यरात्र झाली.

आधी  VVPAT मधील प्रिंट आऊटची मोजणी करण्यात आली, त्यानंतर ईव्हीएम मशिन्ससोबत त्याची पडताळणी केली,त्यानंतर या 4 जागांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

10 मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, तरीही भाजपचा पराभव

या निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यासाठी भाजपने आपल्या 10 मंत्री-नेत्यांचा ताफा नांदेडमध्ये डेरेदाखल केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यासारख्या नेत्यांची फौज नांदेडमध्ये दाखल झाली होती.

मात्र एकट्या अशोक चव्हाणांनी या सर्वांचा सुपडासाफ करुन,नांदेडमध्ये आपणच सम्राट असल्याचं दाखवून दिलं.

भाजपला अवघ्या 6 जागा

इतक्या नेत्यांची फौज लावूनही नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपला ‘अशोकचक्र’ भेदता आलं नाही. आतापर्यंत लागलेल्या 77 जागांच्या निकालात भाजपला केवळ 6 जागांवर विजय मिळाला. यामधील 2 उमेदवार हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले होते.

काँग्रेसचा एकहाती विजय

या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 41 जागा जिंकत, नांदेड वाघाळा महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. यंदा तगडं आव्हान असूनही काँग्रेसने त्यापुढे मजल मारुन 50 चा आकडा सहज पार केलाच, पण मोठी मजल मारुन तब्बल 73 जागा जिंकल्या.

सर्व 24 मुस्लिम उमेदवार विजयी

यावेळी अशोक चव्हाणांनी 24 मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवलं होतं. त्या सर्वांनी विजय मिळवला.

सय्यद शेर अली आणि आशिया बेगम अब्दुल हबीब हे दोघे विद्यमान MIM नगरसेवक हे नुकतेच काँग्रेसमध्ये आले होते. त्यांनीही विजय खेचून आणला.

MIM हद्दपार

ज्या महापालिका निवडणुकीतून MIM ने महाराष्ट्रात प्रवेश केला होता, त्याच नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत MIM हद्दपार झाली.

गेल्या निवडणुकीत तब्बल 11 जागा जिंकणाऱ्या MIM ला यंदा भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे नांदेडमधील मतदारांनी MIM ला स्पष्ट नाकारल्याचं चित्र आहे.

प्रताप चिखलीकर बूमरँग ठरले?

भाजपचा जाहीर प्रचार करणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार हे भाजपसाठी बूमरँग ठरल्याचं निकालावरुन दिसून आलं. कारण शिवसेना-भाजपाच्या वादाचा फायदा काँग्रेसला झाल्याचं दिसून आलं. तसंच भाजप आणि शिवसेना यांच्या उमेदवारांच्या मतांचं अंतर हे खूपच कमी आहे. त्यामुळे या दोघांच्या वादात काँग्रेसने मुसंडी मारली.

चिखलीकरांचा पुतण्या हरला

भाजपला विजय मिळवून देण्याचा विडा उचललेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना, स्वत:च्या पुतण्यालाही निवडून आणता आलं नाही.

काँग्रेस उमेदवार विनय गिरडे पाटील यांनी चिखलीकरांच्या पुतण्याचा पराभव केलं.

पहिल्या महापौरांच्या मुलीचा पराभव

नांदेड महापालिकेचे पहिले महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी आणि विद्यमान स्नेहा पांढरे यांचाही पराभव झाला. सुधाकर पांढरे हे भाजपमध्ये आहेत, सर्वात आधी ते शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये आले आहेत.