CEO Dilip Swami On Kiran Lohar: लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारला (Kiran Lohar) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रुपयांची लाच घेताना (bribe) रंगेहाथ अटक केलं होतं. दरम्यान किरण लोहारच्या निलंबनाच्या कारवाईत दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला जाऊ लागला होता. यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. किरण लोहार यांना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न नाही, नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणारच, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. 


स्वामी म्हणाले की, एसीबीने ज्या दिवशी कारवाई केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी केवळ प्रेसनोटच्या आधारे लगेचच शासनाला कळवलं आहे. उपसंचालक कार्यालयाकडून आम्हाला पत्र आलेलं होतं. त्यामुळे त्यांनाही आम्ही उत्तर पत्राद्वारे दिलं होतं. पण त्या आधी शासनाला, आयुक्त कार्यालयाला जिथे अहवाल पाठवणे गरजेचे होते तिथे आम्ही पाठवले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा विषयच येत नाही. केवळ उपसंचालकांना पत्र का पाठवलं याच्या आधारे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे, नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी आम्ही कुठला विलंब करतं नाहीये किंवा त्यांना पाठीशी घालत नाहीत, असंही ते म्हणाले. 


लोहार यांच्या बाबतीत याआधी कुठली तक्रार आलेली नाही

दिलीप स्वामी यांनी म्हटलं की, किरण लोहार यांच्या बाबतीत याआधी कुठली तक्रार सामान्य प्रशासन विभाग किंवा स्वीय सहाय्यक कार्यालयात आलेली नाही. तोंडी तक्रार केली असे काही लोकं म्हणतात पण जर कोणती तक्रार आली असती तर नक्कीच कारवाई केली असती. ज्या ज्या अधिकाऱ्याबाबत तक्रार आल्या त्यांच्या तातडीने चौकशी केल्या, कुठल्याही अधिकाऱ्याची तक्रार आली तर मी तातडीने दखल घेतलीय. केवळ शिक्षण विभागच नाही तर इतर ही विभाग बाबतीत आरोप होतात त्यावेळी मी सांगतो कि लेखी तक्रार द्या, प्रशासकीय कामात लेखी तक्रार असणे गरजेचे असते, असं स्वामी म्हणाले.


अशा घटना घडल्यानंतर फार दुःख वाटतं


स्वामी यांनी म्हटलं की, प्रशासकीय सुधारणासाठी मी व्यक्तिगतरित्या देखील प्रयत्नशील असतो.  पण आणखी जर असे विषय पुढे येतं असतील तर जे असे लोकांच्या बाबतीत बदलीच्या अनुषंगाने, लेखी वॉर्निंग, सूचना अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्यात.  सर्वच विभागात पारदर्शी कारभार होईल याची खबरदारी मी घेतोय.  बदलीच्या अनुषंगाने काही तक्रारी आहेत, नियमानुसार जे पात्र आहेत त्यांची लिस्ट तयार करायला सांगितली आहे, एक दोन दिवसात त्याबद्दल कार्यवाही होईल.  एका बाजूला आम्ही रात्रंदिवस काम करत असताना जिल्हा परिषदेची बदनामी होतेय, अशा घटना घडल्यानंतर फार दुःख वाटतं.  काही लोकांच्या अशा वागण्यामुळे नक्कीच बदनामी होते पण भविष्यात असे होणार नाही यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असंही स्वामी म्हणाले. 



ही बातमी देखील वाचा


Kiran Lohar : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार याला निलंबनापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरु?