Kiran Lohar :  लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारला (Kiran Lohar) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 हजार रुपयांची लाच घेताना (bribe) रंगेहाथ अटक केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणं अपेक्षित आहे. मात्र त्यांचं निलंबन प्रशासकीय दिरंगाई करुन लांबवण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच्या निलंबनासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवणं आवश्यक आहे. सोलापूरच्या (solapur) शिक्षण अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे पत्र राज्याच्या शिक्षण उपसंचालकांना लिहिलं आहे.  


मात्र त्या पत्रासोबत लोहारवर दाखल एफआयआरची कॉपी जोडलेली नाही आणि हा अधिकार राज्याच्या शिक्षण आयुक्तांचा आहे, असं शिक्षण उपसंचालकांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देणारे पत्र शिक्षण उपसंचालकानी लिहिलं आहे आणि या गोष्टी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे किरण लोहार यांचा निलंबन होण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे आणि सोबत एफआयआरची प्रत जोडावी लागणार आहे.


प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात यावा
राज्याच्या शिक्षण उपसंचालकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. यामध्ये एफआयआरची कॉपी नसल्याचं सांगण्यात आलं आहे. किरण लोहार हे क्लास वन अधिकारी आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात यावा, असं राज्याच्या शिक्षण उपसंचालकांनी म्हटलं आहे. 


प्रहार संघटनेचा सीईओवर आरोप
किरण लोहार याच्या निलंबनाच्या कारवाईत दिरंगाई केली जात असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. या संघटनेते थेट सोलापूर जिल्हापरिषदेते मुख्य कार्यकारी आधिकारी दिलीप स्वामींवर हा आरोप केला आहे. अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार हे शिक्षण आयुक्तांना असताना त्यांनी उपसंचालकाकडे प्रस्ताव पाठवला. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना कारवाईची प्रक्रिया माहित नाही का? असा सवाल प्रहार संघटनेने उपस्थित केला आहे. लाचखोर शिक्षणाधिकारी यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची तसेच दिलीप स्वामी यांची ही चौकशी करा, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. 


किरण लोहारच्या रत्नागिरीतील कामाचीही चौकशी करण्याची मागणी
किरण लोहार रत्नागिरीमध्ये शिक्षणाधिकारी असताना त्यांनी दिलेल्या बेकायदेशीर शिक्षक मान्यतेविषयी 2016 पासून शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार रत्नागिरीचे आत्माराम मेस्त्री करत आहे. मेस्त्री यांनी बच्चू कडू मंत्री असताना त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं. त्यांनी सप्टेंबर 2011 मध्ये आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानुसार लोहारची चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.  


सुमारे सहा महिने पाठपुरावा केल्यावर मार्च 2022 मध्ये आयुक्तांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना लोहारची चौकशी करण्याचंं सांगितलं होतं. आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी करण्याविषयी सुमारे तीन महिने उपसंचालकांशी पत्रव्यवहार केला. मात्र उपसंचालक दाद देत नव्हते. शेवटी 15 ऑगस्ट 2022 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यावर 28 जुलैला चौकशीसाठी मला बोलावण्यात आलं होतं. मात्र चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यासाठी गेली तीन महिने पत्रव्यवहार करत आहे. मात्र शिक्षण आयुक्त किंवा उपसंचालक दाद देत नाहीत. लोहारच्या या प्रकरणाचा गेली सहा वर्षे पाठपुरावा करत आहे. पण शासन स्तरावरुन लोहार यांना पाठबळ असावं, अशी शंका रत्नागिरीच्या आत्माराम मेस्त्री व्यक्त केली आहे.