Nagpur News : करचोरीच्या संशयावरून आयकर विभागाने (Income Tax) शहरातील तीन मोठ्या व्यावसायिक समूहावर गुरुवारी (3 नोव्हेंबर 2022) छापा मारला. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी याच पथकाने विविध ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तवेज व दागिने जप्त केले आहेत. तर, काही ठिकाणी मारलेल्या छाप्यातून पथकाच्या हाती काहीही लागले नाही. या कारवाईबाबत आयकर विभागाच्यावतीने अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार व लखनऊ येथील आयकर विभागाचे पथक नागपूरच्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई करीत आहेत. या संयुक्त पथकामध्ये जवळपास 150 अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत. आयकर पथकाने दंतमंजन निर्मिती कंपनी विठोबा इंडस्ट्रीज प्रा.लि. (Vithoba Ayurvedic Dant Manjan), टिळकनगरातील आयटी क्षेत्रातील पिनॅकल टेलिसर्व्हिसेस कंपनी (Pinnacle Teleservices Pvt. Ltd) आणि किराणा वस्तूंचा व्यवसाय करणारी मगनलाल हिरामल फर्म  (Maganlal Hiramal Firm) यांच्या ठिकाणांवर गुरुवारी धाड टाकून कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये असलेल्या या तिन्ही उद्योगांशी संबंधित अन्य बारा ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. आयकर विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली आहे. सध्या तिन्ही कंपन्यांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी अशी कारवाई करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना सकाळीच हजर व्हायला सांगितलं जाते. मात्र, नागपुरातील कारवाईआधी आयकर विभागाने अधिकाऱ्यांच्या पथकाला 11 वाजता बोलावलं गेलं होतं.


अघोषित संपत्ती उघड होण्याची शक्यता!


नागपूरमध्ये गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच मोठ्या उद्योग समूहांवर धाडी पडल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाची ही कारवाई काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छापेमारीत आढळलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. पिनॅकल ग्रुपचं कार्यालय गुरुग्राममध्ये आहे. त्याचबरोबर विठोबा ग्रुपच्या नागपूमधील एमआयडीसी स्थित असलेल्या फॅक्टरी आणि तीन भागिदारांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. विठोबा उद्योग समूहाला माल पुरवठा करणारी फर्म 'मगनमल हिरामल'च्या प्रमुखांच्या घरासह आणि इतवारी स्थित असलेल्या दुकानावरही आयकर विभागाने छापेमारीची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.


आजही कारवाई सुरु!


विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी लेखाजोखाशी संबंधित दस्तवेजांची तपासणी केली. ही कारवाई आज, शनिवारीसुद्धा सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे.