सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले (Global Teacher Ranjit Singh Disle ) यांच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये रणजितसंहि डिसले प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या ठिकाणी एकही दिवस हजर राहिले नसल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालातील सर्व निष्कर्ष रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात आहेत.
रणजितसिंह डिसले यांच्याबाबत पाच सदस्यीय समितीने चौकशी केली असून 6 पानी चौकशी अहवाल आहे. समितीने चौकशी केल्यानंतर सात निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात आहेत. रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी एक दिवस देखील हजर हजर राहिले नाहीत, असा निष्कर्ष समितीने काढला आहे.
अनधिकृत कालावधी
रणजितसिंह डिसले यांना प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी माढा यांनी 18 डिसेंबर 2017 रोजी कार्यमुक्त केले होते. परंतु, डिसले हे 5 फेब्रुवारी 2018 रोजी डायट वेळापूर या ठिकाणी हजर झाल्याचे दिसून येते. 13 नोव्हेंबर 2017 ते 4 फेब्रुवारी 2018 या कालावधीतील कामकाज केल्याचे आदेश संबंधिताकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा कालावधी अनधिकृत आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे.
प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी एकही दिवस उपस्थिती नाही
रणजितसिंह डिसले यांनी डायट वेळापूर याठिकाणी एकही दिवस उपस्थित राहून कामकाज केल्याचे दिसून येत नाही. शिवाय हजेरी पत्रकावरही त्यांनी प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये उपस्थित असल्याबाबत एकही स्वाक्षरी केलेली नाही. डिसले यांनी डायट वेळापूर या ठिकाणी केलेल्या शैक्षणिक कामकाजाबाबत कोणतेही पुरावे महिन्याच्या दैनंदिनी डायट कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
डिसले यांचा मुळ प्रतिनियुक्ती कालावधी हा 17 नोव्हेंबर 2017 असून ते 13 नोव्हेंबर 2017 पासून शालेय कामकाजासाठी उपस्थित नव्हते. तसेच 5 फेब्रुवारी 2018 रोजी डायट वेळापूर कार्यालयात हजर झाले आहेत. 30 एप्रिल 2022 रोजी मुदत संपलेली असल्यामळे 1 मे 2022 रोजी त्यांच्या मुळ शाळेवर हजर होणे अपेक्षित असताना ते डिसले 6 ऑक्टोंबर 2022 रोजी शाळेवर हजर झाल्याचे दिसून येते. यावरुन 13 नोव्हेंबर 20147 ते 4 फेब्रुवारी 2018 आणि 1 मे 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत डिसले यांनी कोठे काम केले याबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही, असे अहवालात म्हटले आहे.
नियमबाह्य आर्थिक व्यवहार
डिसले यांना डायट वेळापूर येथे प्रतिनियुक्तीने हजर होण्यासाठी नियमानुसार शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपूर्ण पदभार तेथील सेवेने कनिष्ठ शिक्षकांना देणे आवश्यक असताना तसे न करता फक्त कागदोपत्री सही करण्यापुरता पदभार कदम यांना दिलेला आहे आणि आर्थिक पदभार हा स्वतःकडे ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येते. हे आर्थिक व्यवहार नियमानुसार केल्याचे दिसून येत नाही.
हजेरी पत्रकावर स्वाक्षरी नाही
सोलापूर विज्ञान केंद्र याठिकाणी डिसले यांनी कामकाज केल्याचे खुलाशात नमुद केले आहे. परंतु प्रत्यक्षात विज्ञान केंद्र सोलापूर या कार्यालयाची माहिती घेतली असता त्यांनी सोलापूर विज्ञान केंद्र येथे कामकाज केले असल्याचे कोणतेही कागदोपत्रावरुन दिसून येत नाही. तसेच त्यांनी 485 पानी दिलेल्या खुलासा पाहता या कालावधीत हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून येत नाही. त्यांनी दिलेल्या खुलाशावरुन हे कामकाज ऑनलाईन पध्दतीने केल्याचे दिसून येते परंतु त्यांना सदर काम ऑनलाईन पध्दतीने करणेबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही.
कराराचे उल्लंघन
जिल्हा परिषद सोलापूर आणि विज्ञान केंद्र सोलापूर यांच्यामध्ये झालेल्या MOU नुसार हा उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी आहे. परंतु, डिसले यांनी या उपक्रमाचे बाहेरील देशामध्ये अथवा जिल्हा परिषद शाळे व्यतिरीक्त सादरीकरण केल्याने MOU मधील नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. याबाबत डिसले यांनी कोणतेही परवानगी वरिष्टाकडून घेतल्याचे दिसून येत नाही, असे अहवालात म्हटले आहे.
रणजितसिंह डिसले यांचे 13 नोव्हेंबर 2017 पासून 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जि.प.शाळा कदमवस्ती (परितेवाडी), सोलापूर विज्ञान केंद्र, सिंहगड इन्टिस्टुट सोलापूर, डाएट वेळापूर यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री, मस्टर, उपस्थिती पत्रक शेरेबुक, इत्यादी पैकी एक ही अधिकृत उपस्थिती पत्रक अथवा हजेरी नोंद उपलब्ध झालेले नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करु शकले नाहीत, असा निष्कर्ष समितीने काढला आहे.
अहवालातील प्रत्येक बाब खोटी : रणजितसिंह डिसले
दरम्यान, याबाबत रणजितसिंह डिसले यांनी अहवालातील प्रत्येक बाब खोटी असल्याचे म्हटले आहे. “अहवालातील प्रत्येक बाब खोटी आहे. अहवाल बाहेर कसा आला? ज्यावेळी मला विचारणा होईल त्यावेळेस खुलासा दिला नाही. अद्याप मला अहवाल दिलेला नाही, असे डिसले यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI