Nashik Vegetable Rate : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने याचा परिणाम भाजीपाल्यावर (Vegetable) झाला आहे. पावसामुळे विक्रेत्यांकडील भाजीपाला खराब होत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असून, भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने दरात मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग सहा दिवसांपासून मुसळधार (Heavy Rain) पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संततधारेमुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना भाजीपाला काढणे देखील कठीण झाले आहे. परिणामी शहरातील बाजार समिती तथा भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक घटून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. 


गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. 


नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 20 किंवा 30 रुपये पावशेर पासून सुरु होऊन 120 ते 160 रुपये किलो पर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या बाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे. 


भाजी विक्रेते अमोल म्हणाले कि, सध्याच्या परिस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरी भागालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यासह पेठ, सुरगाणा, सिन्नर, निफाड इतर भागांतून भाजीपाला दाखल होतो. नाशिक शहरासह मुंबई व गुजरातमध्ये येथून भाजीपाला पाठविला जातो. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजार समितीत येणे अशक्य झाले आहे. पावसामुळे भाजीपाला सडल्यानेदेखील आवक घटली आहे. 


भाज्यांचे दर पावशेर साठी पुढील प्रमाण : 
अद्रक 50 रुपये किलो, लवंगी मिरची किलो, शेवगा 60 रुपये किलो, ढेमशे 55 रुपये किलो, काकडी 400 रुपये कॅरेट, टोमॅटो 500 रुपये कॅरेट, कोबी 150 रुपये कॅरेट, कोथिंबीर 40 रुपये जुडी, कारले 40 रुपये किलो, भोपळा 200 रुपये कॅरेट, फ्लॉवर 150 रुपये दहा किटचे अशा पद्धतीने आजचे भाजीपाला दर आहेत.