Ujni Dam: राज्यात धुंवाधार झालेल्या पावसामुळे आणि मायनसमध्ये गेलेलं उजनी धरण (Ujni Dam) ओफरफ्लो झालं.  उजनी आणि वीर धरणातून जवळपास दीड लाख क्युसेक विसर्गाने चंद्रभागेत पाणी येत असताना शेतकऱ्यांना गरज असताना उजनीचे कालवे मात्र कोरडे पडले आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.


सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहत असली तरी कालवे कोरडेच असल्याने सोलापूरकरांना कालव्यातील पाण्याची प्रतीक्षा आहे. आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यास पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे.


कालव्यात पाणी सोडून पाझर तलाव भरण्याची मागणी


धरणातून विसर्ग होत असला तरी कालव्यात पाणी मात्र सोडले जात नसल्याने शेतकरी नाराज बनलेला आहे तातडीने शासनाने उजनीच्या कालव्यात पाणी सोडून सर्व पाझर तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे. शासनाला आवाहन करताना इंगळे यांनी कोरड्या कॅनॉल मधून उभे राहून परिस्थिती दाखवली आहे .


पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आश्वासन


याबाबत उजनी प्रशासनाशी संवाद साधला असता उजनी मुख्य कालव्याच्या काही भागात अस्तरीकरणाचे काम सुरू होते त्यामुळे कालव्यात पाणी सोडता आले नसल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले .काल हे अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी 6 वाजेपासून 500 क्युसेक विसर्गाने मुख्य कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली.  उद्या सकाळपासून पूर्ण क्षमतेने म्हणजे 3000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जाईल असे आश्वासन देण्यात आलं आहे. उजनी सध्या 108% भरली असून आता उजनीतून  सीना माढा , दहिगाव उपसा सिंचन योजना व बोगदा मधूनही पाणी सोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


उजनी धरण 91 टक्के भरले


उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून उजनी धरणातून भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. मात्र, रात्री 8 नंतर 40 हजार क्युसेकने हा विसर्ग करण्यात येत आहे. उजनी धरण 89 टक्क्यापेक्षा अधिक भरलं असून भीमा काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 91 टक्के इतकं भरलं असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी 5 पाच वाजल्यापासून 21 हजार 600  क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला होता. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 95 हजार 200 क्युसेक इतका विसर्ग येत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. उजनी धरणाचे 16 दरवाजे हे 40 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. उजनी धरण हे एकूण 117 टीएमसी क्षमतेचा असून सध्या उजनी धरणात 111 पूर्णांक 77 टीम्स इतका पाणीसाठा झाला आहे.


हेही वाचा:


उजनी धरण भरलं हो, 40 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका, 500 जणांना हलवलं