Solapur: विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ. देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे . विठुराया आणि वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय मात्र आता मरणासन्न अवस्थेत आलाय. विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून तुळशीमाळ (Tulsimaal business Pandharpur) बनवणारा समाज आता आर्थिक संकटात सापडला असून या हस्तकलेला अनुदान दिल्यास हाताने बनवलेली ही तुळशीची माळ पुढच्या पिढ्यांना पहायला मिळेल अशी मगणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
गळ्यात तुळशीची माळ हीच वारकऱ्यांची ओळख. विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही १०८ मण्यांची तुळशीमाळ बनते . वारकरी संप्रदायाच्या उगमापासून ही तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय काशीकापडी समाज करीत असल्याचा दावा या समाजाकडून केला जातो . मात्र, पंढरपुरात ३०० हून अधिक वर्षे हा व्यवसाय हा समाज करीत आला असल्याचा इतिहास आहे .
कशी बनते तुळशीची माळ?
संपूर्णपणे हाताने बनविणाऱ्या या व्यवसायात सुरुवातीला कृष्ण तुळस किंवा रानतुळशीची लाकडे आणली जातात. ही लाकडे तासून त्यापासून मणी बनविले जातात. मग त्याच्या माळा घरातील महिला ओवून घेतात . या व्यवसायात काशीकापडी समाजाचा तरुणवर्ग 12 महिने हे काम करीत असतो .
तुळशीमाळेवर मशीनवर बनवलेल्या चायना माळेचे आक्रमण
आषाढी, कार्तिकी यात्रा कालावधीत जवळपास दोन महिने हे काम जोरात चालत असले तरी वर्षभर या तुळशीमाळाना वारकरी संप्रदायाकडून मोठी मागणी असते . मात्र, या माळेतून घर प्रपंच चालेल असे उत्पन्नही मिळत नसल्याने आता या समाजातील तरुण या व्यवसायापासून लांब जाऊ लागला आहे . यातच या भक्तीच्या बाजारात लाकडी भुश्यापासून मशीनवर बनविलेल्या चायना माळेने आक्रमण केल्याने हा व्यवसाय मरणासन्न अवस्थेत पोचला आहे .
तुळशीमाळ व्यवसायाला अनुदान देण्याची मागणी
वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या या तुळशीमाळ व्यवसायाला मुख्यमंत्र्यांनी अनुदान दिल्यास हा सटकलेचा व्यवसाय पुढील पिढ्यात टिकू शकेल अशी मागणी या समाजाचा तरुण श्रीनिवास उपळकर याने केली आहे . यासाठी या समाजातील तरुणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनुदान देण्याची मागणी करणार आहे .
वारकऱ्यांचे दैवत असणारी तुळशीमाळ
वारकरी संप्रदायाला तुळशीमाळ म्हणजे जगण्याचे अगाध तत्वज्ञान देणारी. याच भावनेने जशी स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते तशीच ती वैष्णवांची या तुळशीमाळेने होते . देवाला तुळस प्रिय, म्हणूनच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते .
पंढरपूरात ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो म्हणून या माळेला इथे विशेष महत्व असते . अंगणात तुळशीची पूजा केली जाते .त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते .ऑक्सिजनचे प्रमाण वाढते . माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याप्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात अशी भागवत धर्मात धारणा आहे .
शेकडो वर्षांपासून चालणाऱ्या व्यवसायाकडे तरुणांची पाठ
वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही संबोधले जाते. तुळशीची माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते . अशावेळी हा शेकडो वर्षांपासून चालत आलेला आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीशी जोडला गेलेल्या व्यवसायाला अनुदान मिळाले तर जे तरुण या व्यवसायापासून दूर गेलेत ते पुन्हा या व्यवसायाकडे वाळू शकणार आहेत . यासाठी पंढरपूरमध्ये एक हजारापेक्षा कमी व्यावसायिक असून त्यांना अनुदान दिले तर भविष्यातील पुढच्या वारकरी पिढ्यांच्या गळ्यातही खऱ्या तुळशीची माळ दिसेल .
हेही वाचा:
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त