Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रेल्वेच्या सेवेवर देखील परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. दरम्यान, आजही हवामान विभागानं (IMD) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
'या' भागात आज पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबईसह परिसरात सहा तासात 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद
मुंबईसह परिसरात कालपासून मुसलधार पाऊस सुरु आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.आज दिवसभर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
कोकणात मुसळधार पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढत आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभर पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं. त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असं असलं तरी आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. एकंदरीत पावसाचं वातावरण पाहता आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या: