सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणतेही मोठे कार्यक्रम करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले होते. मात्र बार्शीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केक कापून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. यावरुन बार्शी नगरपालिकेने शिवसेनेच्या नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी नसताना सार्वजनिक रस्त्याच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहरातील पांडे चौक आणि इतर रस्त्याच्या कडेला 50 वृक्ष लागवडीसाठी नियोजन केले होते. जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करण्याचे काम सुरु असताना नगरपालिकेचे उपभियंता दिलीप रामचंद्र खोडके हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यावेळी उपभियंता खोडके यांनी जेसीबी चालकास खड्डे करण्याची परवानगी आहे का? याची विचारणा केली. मात्र परवानगी नसल्याचे लक्षात आल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही बाब कळवली. त्यानंतर त्यांनी उपभियंता यांना पोलिसात तक्रार देण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार उपभियंता दिलीप खोडके यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांसह पाहणी केल्यानंतर 2x2 आकाराचे 40 खड्डे करण्यात आल्याचे निदर्शनास आले.


कोणतीही परवानगी नसताना सार्वजनिक रस्त्यावर खड्डे करुन सार्वजनिक रस्त्याच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेसीबी चालक अण्णासाहेब नगरकर यांच्यासह शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र गायकवाड, सचिन ढावरे, विश्वजीत जाधवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादविं कलम 431, 34, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 तसेच जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी बाबत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान हा गुन्हा जाणीवपूर्वक करण्यात आला असून असे शंभर गुन्हे दाखल झाले तरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्य करत राहू अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम करु नये असे आवाहन केल्यानंतर फक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून वृक्षारोपण करण्याचे ठरविले होते. वाढदिवसानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात दोन वृक्ष लावण्यात आले आहेत. नगरपालिकेची परवानगी घेऊन त्यांच्यात हस्ते आणखी वृक्ष लावण्यात येतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या : 


सावधान...! ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्सचा वापर घातक


सोलापुरातील बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; मुलानेच केली चारित्र्यहीन बापाची हत्या


राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील