कोल्हापूर : प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत  पाटील यांनी बोलून दाखवला.


"मी आम्हा सगळ्यांचं सामूहिक मानस व्यक्त करत आहोत," अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. "राज्याच्या हितासाठी केंद्राने फॉर्म्युला तयार केला आहे. मुळात तो शिवसेनेला मान्य झाला, शिवसेना सध्या खूप हवेत आहे. त्यांना वाटतंय की स्वर्गाला बोटं टेकली आहेत. ते ऐकतील असं नाही," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.


यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे. भाजपच्या मदतीने शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. मोदींच्या सभांचा फायदा शिवसेनेला झाला आहे. अशावेळी शिवसेना विरोधात बसली असती तरी चाललं असतं. मात्र ज्यांच्याविरोधात लढलात सत्तेसाठी त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे आगामी काळात जरी राज्याच्या हितासाठी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र वेगळ्याच लढल्या जातील.


सरकार नीट चाललंय की नाही यावर चौथीतला मुलगाही निबंध लिहिल : पाटील
चौथीतल्या मुलाला निबंध लिहायला सांगितला तरी तो लिहिल की सध्याचं सरकार राज्याचं हित पाहत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात. ही सगळं पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर सरकार नीट चाललंय की नाही हे चौथीतला मुलगा किंवा मुलगी सुद्धा निबंध लिहिल," असंही पाटील म्हणाले.


तेव्हाही एकत्र यायला तयार होतो...
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी या दोन्ही पक्षांना राज्यातही लक्षात आले नाही का?असं विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही तयार होतो, मात्र शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मागतातच कसे? राज्याचा हिताचा विचार त्यांनीही केला पाहिजे. हितासाठी अवाजवी मागू नये, वाजवी मागावं. यावेळी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र शिवसेनेला ते मान्य नव्हते.


"मात्र या संदर्भातले सगळे निर्णय हे आमचे केंद्राच्या पातळीवरुन होत असतात. त्यामुळे मोदींनी फॉर्म्युला तयार केला आणि उद्धव ठाकरेंनी तो मान्य केला तर या सगळ्या पुढच्या गोष्टी असतील," असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.