सोलापूर : सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी निवडणुकीसाठी सादर केलेला जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार अक्कलकोट यांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावाचे बेडा जंगम या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश ही समितीतर्फे देण्यात आले आहे. तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात सोलापूर न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तात्काळ लेखी फिर्याद दाखल करण्याचे आदेश ही या निकालपत्रात देण्यात आले आहेत.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि आज तो निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 आणि 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुनी संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्त दक्षता समितीमार्फत चौकशी करण्यात यावी असा अर्ज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वकील अॅड. संतोष नाव्हकर यांनी केला. मात्र जिल्हा जात पडताळणीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पुर्ण झाल्याचे कळविले.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात पडताळणीबाबतचा निकाल 3 ते 4 दिवसात येण्याची शक्यता
दरम्यान आता तक्रारदार आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य दोघेही उच्च न्यायालयात जाणार आहेत. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या दाखल्याविरोधात उच्च न्यायालयात या आधीच तक्रार दाखल आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीचा हा निकाल तक्रारदारमार्फत उच्च न्यायालयात सादर केला जाईल. तसेच लोकसभेचे सभापती आणि निवडणूक आयोगाकडे देखील हा निकालपत्र सादर करत खासदारकी रद्द करण्यात मागणी करणार असल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली. तर इकडे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे देखील उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार असल्याची माहिती त्यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी दिली. जात पडताळणी समितीने तक्रारदारांच्या दबावात काम केलं. त्यामुळे समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्प परिचय
काय म्हटलं आहे निकालपत्रात?
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने 34 पानांचा निकालपत्र जाहीर केला आहे. जात वैधता पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ यांच्यासह 5 जणांच्या समितीने हा निकाल जाहीर केला. या निकालपत्राच्या शेवटी 5 निर्णय समितीने जाहीर केले आहेत...
1. सामनेवाला श्री. नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम (अजा.) या जातीचा दावा अमान्य करण्यात येत आहे.
2.तक्रारदार क्र १ ते ३ यांचे तक्रारी अर्ज मंजुर करण्यात येत आहेत.
3. सामनेवाला श्री हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट एसआर/क्र. ८२७/१९८२ दि. १५.०१.१९८२ हे अवैध (INVALID) ठरविण्यात येत आहे.
Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
4. कार्यकारी दंडाधिकारी, तथा तहसिलदार अक्कलकोट, सोलापूर यांनी सामनेवाला श्री. हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्याची कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करावा.
5. तहसिलदार, अक्कलकोट, जि-सोलापूर यांनी महाराष्ट्र अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग व्यक्तीना (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम,२००० मधील कलम ११ {(१) अ,ब} कायद्यातील तरतुदी अन्वये सामनेवाला श्री.नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी व इतर यांचे विरुध्द मा. न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे न्यायालयात तात्काळ लेखी फिर्याद दाखल करावी.