मुंबई : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (23 फेब्रुवारी) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, "दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीची उद्या (24 फेब्रुवारी) जाहीर होणारी यादी ही पहिली असेल, अंतिम नाही. अफाट काही तरी जाहीर करायचं आणि ते पेलत नाही म्हणून उताणं पडायचं, अशी आमची वृत्ती नाही. मागील सरकारमध्ये आम्हीही होतो. त्यावेळी त्यांनी जी कर्जमाफी योजना केली होती ती अजून सुरु होती. त्यामुळे आम्ही जे ठरवलं आहे ते नियोजित वेळेत पूर्ण करु."


Farmers Loan Waiver | ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची वचनपूर्ती


कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद
विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.


वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचं स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना  मिळाला आहे. या घोषणेमुळे शेतकरी वर्ग सुखावला असून ते सरकारचे आभार मानत आहेत.


शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
शेतकरी कर्जमाफी योजनेचा हिंगोलीतील समगा गावातून शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आपले सरकार केंद्रावर पहिल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची पावती देऊन सन्मान करण्यात आला. लाजी पुरभाजी कुरवडे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.


शेतकरी कर्जमाफीत कोणताही गोंधळ होणार नाही : बच्चू कडू
शेतकरी कर्जमाफीत कोणताही गोंधळ होणार नाही, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रक्रियेत कोणताही गोंधळ होणार नाही. सगळ्या गावांमध्ये आम्ही याबाबत प्रचार करणार आहोत."