सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्प परिचय
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2019 04:49 PM (IST)
सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं.
सोलापूर : सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करुन भाजपने शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना तिकीट दिलं आहे. सोलापुरात काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांना महास्वामी तगडी टक्कर देतील अशी चर्चा आहे. त्यातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही सोलापुरातून शड्डू ठोकल्यामुळे सोलापुरातील लोकसभेची निवडणूक तिहेरी होईल. भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत सोलापूरची जागा वेटिंगवर ठेवली होती. मात्र आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत सोलापूरच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या नावाची चर्चा होतीच, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं. धर्मगुरु डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्पपरिचय डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करुन ते सामाजिक कार्यात सहभागी झाले आहेत. सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली.