सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतली मुलं आता जगाशी संपर्क साधत आहेत. कारण, या शाळेतील विद्यार्थी क्यू-आर कोड प्रणालीद्वारे हायटेक शिक्षण घेत आहेत. ही सगळी किमया जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजीत डिसले या मराठी शिक्षकाने सत्यात आणली आहे. त्यामुळे त्यांना थेट मायक्रोसॉफ्टने पाचारण केलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील परीतेवाडीत 200 लोकवस्तीच्या कदम वस्तीतील मुलं स्मार्टफोनच्या आधारे शिक्षण घेत आहेत. या शाळेतील शिक्षक रणजीत डिसले यांनी यासाठी क्यू-आर कोड प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे पहिलीचे विद्यार्थी हायटेक पद्धतीने शिक्षण घेत आहेत.

लहान मुलांमधील मोबाईल विषयीची आत्मियता लक्षात घेऊन, डिसले गुरुजींनी यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. बालभारतीच्या क्रमिक पुस्तकातील प्रत्येक धड्यावर क्यू-आर कोड चिटकवला असून, गुगल ड्राईव्हचा वापर करुन डिसले यांनी मुलांसाठी हे तंत्र विकसित केलं आहे. पालकांच्या स्मार्टफोनवर हा कोड स्कॅन करुन संबंधित कविता, त्याची चाल किंवा धडा, त्यातील आशय चित्ररूपाने दिसू लागतात.

सध्या पहिलीच्या मुलांसाठी पाठ्यपुस्तकात या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला असून, डिसले गुरुजींच्या या अभिनव संकल्पनेमुळे त्यांना थेट मायक्रोसॉफ्टन पाचारण केलं आहे.

जेमतेम 200 लोकवस्तीच्या या गावात जायला ना पक्का रस्ता आहे ना बस. पण एका खोलीत भरणाऱ्या या शाळेच आज जगभरात कौतुक होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लहान वयातील मुलांना अद्ययावत बनवणाऱ्या मराठी शाळेतल्या या शिक्षण पद्धतीला आता शासनाने सुद्धा मान्यता दिली आहे.