जळगाव : भाजपमध्ये आपली अवस्था राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे, अशी मार्मिक टिपणी महाराष्ट्रातले पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी केली. नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.


जळगाव जिल्हा भाजपच्या संघटन बैठकीत खडसेंचं पुनर्वसन करण्याचा ठराव करावा, यासाठी खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करुन पक्षाच्या शिस्तीचं पालन करण्याचा सल्ला खडसेंनी दिला.

इतकी वर्ष आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केलं. अडवाणींची परिस्थितीही तीच आहे. आयुष्यभर त्यांनीही मेहनत केली, आता नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावं असं चित्र असल्याचं वक्तव्य खडसेंनी केलं.

दिवसेंदिवस मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे भाजपची जोमाने वाढ होत आहे, आगामी काळात राज्यातील अनेक मोठे दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी यावेळी दिले.

भाजप पक्षाची होणारी वाढ पाहता पुढच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही पक्ष जगाच्या नकाशावरुन नाहीसे होण्याची भीतीही यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

खडसेंच्या पुनरागमनावरुन खडसे समर्थकांनी घातलेल्या गोंधळावर महाजनांनी नाराजी व्यक्त केली. 'ते यावेत, हे जसं प्रत्येकाला वाटतं, तसं आम्हालाही वाटतं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. योग्य वेळी ते येतीलच, मात्र त्यासाठी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणं योग्य नसल्याचं मत महाजनांनी व्यक्त केलं.