सोलापूर :  सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे (Solapur Deputy Mayor Rajesh Kale) तडीपार करण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तसेच इंदापूर तालुक्यातून त्यांना तडीपार करण्यात आलं आहे. राजेश काळे हे भाजपचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत.  शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप काळे यांच्यावर आहेत. स्वतः राजेश काळे यांच्याकडून तडीपारीचे आदेश प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. निवडणुका तोंडावर असताना राजकीय द्वेषापोटी कारवाई झाल्याची टीका काळे यांनी केली आहे. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.  ते स्वतः सोलापूर सोडून निघाले आहेत, अशीही माहिती आहे. 


राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलालाही तडीपारीचे आदेश


महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर तथा भाजपचे नगरसेवक राजेश काळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड यास पोलिसांनी तडीपार घोषित केले आहे. सोलापूर, उस्मानाबाद तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून या दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सोलापूर पोलीस आयुक्तालयासह अन्य काही पोलिस स्थानकात देखील गुन्हे दाखल आहेत. राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाहय पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यावसायीकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी आणि सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करीत असतानासुध्दा धाकदपटशा दाखवण्याच्या उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये याकरीता अंगावर जाणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे राजेश काळे यांच्याविरोधात दाखल आहेत. त्यामुळे सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 







दरम्यान "सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे निवडणुकापूर्वी राजकीय द्वेषापोटी आपल्यावर ती ही कारवाई झाल्याचा आरोप उपमहापौर राजेश काळे यांनी केला. सर्वपक्षीय नेत्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान रचले आहे. माझ्यावर खून, दरोडा अशा प्रकारचे कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत. सामाजिक काम करत असताना झालेल्या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असून यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागणार आहे." अशी प्रतिक्रिया तडीपारीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे यांनी दिली. 

 

"आपल्या साथीदारासह सामान्य नागरीकांना शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करुन वेळप्रसंगी जीवे ठार मारणे, साथीदारासह नागरीकांना विनाकारण मारहाण करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या चेतन नागेश गायकवाड या इसमास सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे." असे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिले आहेत. 


 





उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ आणि खंडणीची धमकी


काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करणे तसेच खंडणीची मागणी करणे या आरोपांवरुन भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजेश काळे यांच्या विरोधात सोलापुरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, खंडणीची मागणी करणे इत्यादी आरोपांवरुन गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याची नोंद होताच उपमहापौर राजेश काळे हे फरार झाले होते.  
 
भाजप पक्षाच्यावतीने उपमहापौर राजेश काळे यांना शिस्तभंगाची नोटीस


दुसरीकडे त्यांच्या पक्षाने देखील त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी घरचा आहेर दिला होता. "राजेश काळे हे महानगरपालिकेत उपमहापौर सारखे महत्वाचे पद भूषवित आहेत. त्यांचे वर्तन पदाला साजेसे नाहीये. बेशिस्त वर्तनामुळे सभागृहातील सदस्यांचे अनेक वेळा तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. ज्यामुळे पक्षाबद्दल अकारण गैरसमज निर्माण होत आहेत. पक्षाने वेळोवेळी विचारणा करुन देखील योग्य खुलासा आपल्यामार्फत करण्यात आला नाही. त्यामुळे आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा 24 तासात करावा" अशी नोटीस भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी बजावली होती.


संबंधित बातम्या