सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौरांवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, 'तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन' अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे.


यासंदर्भात पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून उपमहापौर काळे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री काळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र राजेश काळे हे घरातून फरार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


दरम्यान याप्रकरणी उपमहापौर काळे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी सधन घरातील असून मला कोणत्याही प्रकारच्या पैशांची गरज नाही. त्यामुळे खंडणीचा आरोप खोटा असल्याची प्रतिक्रिया राजेश काळे यांनी दिली. तसेच उपायुक्त धनराज पांडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्या संदर्भात मी तक्रार दिली म्हणून खोटी तक्रार दिल्याचा दावा देखील काळे यांनी केला आहे.


सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद


अधिकाऱ्यांकडून उपमहापौरांचा निषेध
दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपमहापौरांचा निषेध केला आहे. आजपासून काळ्या फित्या लावून काम करणार असल्याची माहिती आहे. राजेश काळे यांचा सदस्यत्व पद रद्द करावं, अशी मागणी पालिकेचे कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे. काळे यांच्या विरोधात पालिकेतील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यात पालिकेचे अधिकारी देखील सहभागी झाले. पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहायुक्त सुनील माने, नगर अभियंता संदीप कारंजे, नगररचना विभाग प्रमुख लक्ष्मण चलवादी इत्यादी अधिकारी आंदोलनात सहभागी झाले.


भाजपच्या नगरसेवकांनी देखील काळ्या फिती लावून दिला घरचा आहेर


उपायुक्त धनराज पांडेंना केलेल्या शिवीगाळाचा निषेध करत भाजपच्याच नगरसेवकांनी राजेश काळे यांना घरचा आहेर दिला. राजेश काळे यांनी वापरलेली भाषा ही अतिशय निंदनीय असून त्यांच्या कोणत्याही भाषेचं पक्ष समर्थन करत नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला त्यांनी सामोरं जावं. तसेच या बाबात सर्व माहिती वरिष्ठांना कळवू. पक्ष यावर योग्य पद्धतीने कारवाई करेल अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी दिली. तर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटीस, नागेश वल्याळ, प्रभाकर जामगुंडे यांनी काळी फिती लावून उपायुक्तांना पाठिंबा दिला. तर राजेश काळे यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणार असल्याचं भाजपच्या नगरसेवकांनी केली.