सोलापूर : फ्लॅट गैरव्यवहार प्रकरणी अटकेची प्रक्रिया सुरू असताना काल सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना ताप आणि शिंका येऊ लागल्या होत्या. काळे यांनी कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस देवून सोडले होते. मात्र आज राजेश काळे यांनी मी ठणठणीत असल्याचं म्हटलं आहे. राजकीय सूडभावनेतून मानसिक त्रास देताहेत, मी कोर्टात उत्तर देईल, असंही त्यांनी माध्यमांना व्हॉट्सअॅपद्वारे दिलेल्या खुलाश्यामध्ये म्हटलं आहे.

मी कोर्टात उत्तर देणार, राजेश काळे यांचा खुलासा
उपमहापौर राजेश काळे यांनी म्हटलं आहे की, माझ्यावर 2005 मध्ये एका फ्लॅट संदर्भात व्यवहारामध्ये साक्षीदार म्हणून सही केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता ही गोष्ट मला माहीत नव्हती. या संदर्भामध्ये तो गुन्हा 2019 या साली 14 वर्षाने दाखल केला. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की सत्य काय आहे?. चौकशी कामी मला कोरोना व्हायरस कोविड काळात पुण्याला घेऊन जाण्यात आले. माझी कोणतीही चौकशी न करता, मेडिकल तपासणी न करता, अटक करून कोर्टासमोर न घेऊन जाता मानसिक त्रास देण्याचे काम राजकीय सूडभावनेतून करण्यात आले.याचे उत्तर मी कोर्टात देणारच आहे, असं काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जर मला शिंक नी खोकला आला असतात तर मला तिथेच क्वारंटाईन करून कोविड हॉस्पिटलला पोलिसांनी दाखल केले असते हे उघड सत्य आहे. सोलापूरमध्ये विविध प्रकारच्या विविध बातम्या लागल्या आहेत त्यावर विश्वास ठेवू नये. मी नेहमीप्रमाणे मस्त आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद

अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळे यांना ताप आणि शिंका
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळे यांना ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळे यांनी कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळे यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. पण खरंच काळे यांना ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काळे यांना शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळे यांनी पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळे यांनी हा बहाणा केल्याचं बोललं जातंय.

पोलिसांची भूमिकाही संशयास्पद

सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या काळे यांना काल रात्री पिंपरी चिंचवडमध्ये आणताच, त्यांचं मेडिकल चेकअप झालं. तेव्हा काळें यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मग दाखल गुन्ह्यात काळेंची चौकशी सुरू झाली. तेव्हा मात्र काळेंना ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं आहेत, असं कारण पुढं करत काळे यांना शनिवारी पाच वाजता नोटीस बजावून सोडण्यात आले. पण काही तासांपूर्वी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली. वरिष्ठांच्या कानावर ही बाब पडताच. याप्रकरणाची तपासणी करणारे पोलीस उपनिरीक्षक आर एस पन्हाळे यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.