सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करणे तसेच खंडणीची मागणी करणे या आरोपांवरुन भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश काळे यांच्या विरोधात सोलापुरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, खंडणीची मागणी करणे इत्यादी आरोपांवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद होताच उपमहापौर राजेश काळे हे फरार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांद्वारे त्यांचा शोध घेतला जात आहे.
दुसरीकडे राजेश काळे यांच्या अटकेसाठी महानगरपालिकेतील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज एक दिवस काम बंद करत लाक्षणिक आंदोलन कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेत सर्व कामकाज आज ठप्प झाले आहे. काल दिवसभर पालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून राजेश काळे यांचा निषेध केला. आज मात्र कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी पालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालपर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने पालिकेच्या परिसरातच कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन ठिय्या आंदोलन केले.
VIDEO | 'मै कैसा मुसलमान हूँ?', अखेर नसिरुद्दीन शाह व्यक्त झालेच
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेससह राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाचा पाठिंबा
सोलापूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आंदोलनाला पाठिंबा देत राजेश काळे यांच्यावर टीकास्त्र साधलं. तर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री हे देखील आंदोलनात सहभागी झाले. दुसरीकडे सकल मराठा मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
कोविडच्या काळात उपायुक्त धनराज पांडे यांनी कौतुकास्पद काम केलं आहे. त्यांच्याविरोधात अशाप्रकराची भाषा वापरणे हे अतिशय चुकीचे आहे. अँट्रासिटी कायद्याची धमकी देऊन एखाद्या अधिकाऱ्याला खंडणी कोणी मागत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे. यासाठी आंदोलनात सहभागी झालो आहे. अशी प्रतिक्रिया माऊली पवार यांनी दिली.
शीतलहरीचा कहर; - 26 अंश तापमानामुळं द्रास, कारगिल मधील जनजीवन विस्कळीत
भाजप पक्षाच्यावतीने उपमहापौर राजेश काळे यांना शिस्तभंगाची नोटीस, २४ तासात खुलासा करण्याच्या सुचना
उपमहापौर राजेश काळे यांच्यावर गन्हा नोंद झाल्याने एकीकडे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाने देखील त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी घरचा आहेर दिला होता. "राजेश काळे हे महानगरपालिकेत उपमहापौर सारखे महत्वाचे पद भूषवित आहेत. त्यांचे वर्तन पदाला साजेसे नाहीये. बेशिस्त वर्तनामुळे सभागृहातील सदस्यांचे अनेक वेळा तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. ज्यामुळे पक्षाबद्दल अकारण गैरसमज निर्माण होत आहेत. पक्षाने वेळोवेळी विचारणा करुन देखील योग्य खुलासा आपल्यामार्फत करण्यात आला नाहीये. त्यामुळे आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का कऱण्यात येऊ नये याचा खुलासा 24 तासात करावा" अशी नोटीस भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी बजावली आहे.