Solapur Crime Updates: सोलापुरात प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला प्रियकरासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पत्नीनचं आपल्या पतीची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. बुधवारी पहाटे सोलापुरातल्या मुळेगाव रोड (Solapur News live) परिसरात दशरथ नारायणकर या व्यक्तीची हत्या झाली होती. याबाबत मृत व्यक्तीची पत्नी अरुणा नारायणकर हिने पोलिसांत फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात फिर्याद देणारी मृताची पत्नी हीच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून मृत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा हिने आपला प्रियकर बाबासो बालशंकर याच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 


अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावचा दशरथ नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. मात्र 21 सप्टेंबर रोजी दशरथ याची हत्या करण्यात आली. आर्थिक व्यवहारातून दशरथ याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. याबाबत तपास सुरु असताना मृताच्या पत्नीचे बाबासो बाळशंकर या तरूणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातून शंका निर्माण झाल्याने पोलिसांनी पत्नीचीच चौकशी केली. सुरुवातीला अरुणा हिने उडवाउडवीची उत्तरे दिली.


दुसरीकडे संशयित प्रियकर बाबासो बालशंकर याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे तीन पथके त्याच्या शोधात होती. सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने मुळेगाव क्रॉस रोडवरून संशयित बाबासो बाळशंकर याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर बाबासो बाळशंकर याने मृताच्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची कबुली दिली. तसेच अरुणा हिच्या मदतीनेच दशरथ याची हत्या केल्याची कबुली दिली. 


पत्नी अरूणाने हिने स्वतःच प्रियकर बाबासो बाळशंकर याच्या मदतीने पती दशरथचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. हत्येसाठी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी, चाकू इत्यादी साहित्य खरेदी केले होते. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अरुणा हिचे व्हॉट्सअप चॅट देखील यावेळी पोलिसाच्या हाती लागले. त्यानंतर मात्र तिने हत्येची कबुली दिली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दशरथचा खून केल्याची माहिती दोघा आरोपींनी दिली. आरोपी अरुणा नारायणकर आणि आरोपी बाबासो बाळशंकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या