Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काल (22 सप्टेंबर) हवामान विभागानं (Meteorological Department) विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला होता. मात्र, तुरळक ठिकाणीच पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
दरम्यान, मागील तीन ते चार दिवसात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेत जमिनी खरवडून देखील गेल्या आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी या पावसामुळं पिकं पिवळी पडू लागली आहेत, तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. अशातच आज देखील विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटका


राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton farmers) देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अति पावसामुळं कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळं कापसाचे उत्पन्न कमी होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत


या सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे कुरन सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुरंदर तालुक्यातील सोनोरी हे गाव अंजिराचे आणि सिताफळाचे आगार म्हणून ओळखलं जातं. पंरतू, या गावातील शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पडत असलेल्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. त्यामुळे गावातील 90 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: