सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या बार्शीतल्या एका तरुण प्राध्यापकानं बनवलेल्या लघुचित्रपटाला तेलंगणामधील एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तयार केलेल्या 'बुचाड' या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशाल गरड असं या तरुण प्राध्यापकाचं नावं आहे. विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित बुचाड या लघुचित्रपटाला हा बहुमान मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे विशाल गरड यांनी सदर पुरस्कार शेतकरी वेशात स्वीकारून तो अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केला आहे.
नॅशनल कम्युनिटी मीडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार युनेस्कोचे प्रा.प्रविण पवराला यांच्या हस्ते विशाल गरड यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डी.डी.एसचे डायरेक्टर पी.व्ही.सतीश, प्रसिध्द तेलगु दिग्दर्शक नाग अश्विन, राजेंद्र पाटील, चिन्ना परसम्मा, हैदराबाद विद्यापीठातील प्रा.कांचन मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
'बुचाड'चे छायाचित्रण सचिन नलावडे यांनी केले आहे तर संकलन अमोल लोहार यांनी केले आहे. या लघुचित्रपटात विशाल गरड, वैष्णवी जानराव, वैष्णवी काळे, कादंबरी गरड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
विशाल गरड यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं की, दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न केला आहे. जंगलतोड, प्रदूषण, शहरीकरण, नद्यांचे विस्तारीकरण, औद्योगिकीकरण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे निसर्ग व्यवस्था बदलत चालली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या भीमा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याची गोष्ट बुचाड' या लघुचित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय, असं विशाल गरड यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं.