जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच काल सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांच्या कोरोनाच्या अहवालावरून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारण गेल्या चार महिन्यात खडसे यांना तिसऱ्या वेळेस कोरोना झाल्यानं खडसे हे चर्चेचा विषय बनले आहेत.


गेल्या चार महिन्यापूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाच्या सदृश्य काही लक्षणे आढळून आल्यावर त्यांनी एका खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन करून तपासणी केली असता त्यांच्या छातीत कोरोना सदृश आजाराची लक्षणे आढळून आली होती. या लक्षणांच्या आधारे एकनाथ खडसे यांनी स्वतःच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केलं होतं आणि ते अधिकच्या उपचारासाठी मुंबई येथे दाखल झाले होते. मुंबईत खडसे यांच्या संपूर्ण तपासण्या केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचं निदान करण्यात आल्याने खडसे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला होता.


या घटनेनंतर खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्या नंतर चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. मात्र त्याच्या दोन दिवस अगोदर खडसे यांना पुन्हा कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी जळगाव जिल्ह्यात आपली तपासणी करून घेतली होत. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले होते.


यावेळी मात्र खडसे आणि त्यांच्या परिवाराकडून कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी माध्यमांना दिली नव्हती. मात्र कोरोनाची लागण झालेली असल्याने ईडीच्या चौकशीसाठी खडसे हे उपस्थित रांहणार नसल्याचे त्यांच्या वकिलांनी अर्जाद्वारे सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या घटनेनंतर खडसे पुन्हा काही दिवस मौन बाळगून क्वारंटाईन राहिले होते.


मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान बहुतांश कार्यक्रमात खडसे हे त्यांच्या सोबत राहिले होते. जयंत पाटील उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून मुंबईमध्ये परतताच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे आपली नियमित आरोग्य तपासणी करीत असतानाच कोरोनाची ही तपासणी केली असता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानं एकनाथराव खडसे यांचा कोरोना राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.


खडसे यांच्या कोरोनाच्या बाबतीत विचार केला तर काल त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे सून खासदार रक्षा खडसे या देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. या अगोदर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे त्यांची मुले ही बाधित झाली असल्याच पाहायला मिळाले होते.