Solapur Barshi Froud Case : मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल अखेर गुन्हा दाखल झाला. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. विशाल याने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्राना देखील विशाल फटेने कोट्यावधींची फसवणुक केली आहे. दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र काल एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
Continues below advertisement
विशेष तपास पथक नेमलं जाण्याची शक्यता
गुन्हा दाखल होताना 6 तक्रारदारांचे जवळपास 5 कोटी 63 लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काल रात्रीपर्य़ंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास 12 कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला तपास पोलिस निरीक्षकांकडे होता मात्र आता हा तपास डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करत आहे. या बाबतीत विशेष तपास पथक देखील नेमलं जाण्याची शक्यता आहे.
विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता. इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. 2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली.
विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले. जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.
आरोपी विशालचे कार्यालय, घर सील, बॅंकेतील अकाऊंटही गोठवले
विशाल फटे विरुद्ध गुन्हा नोंद होताच पोलिसांनी उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्य़ालयाची आणि बार्शीतील घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी विविध कागदपत्रे, चेकबुक जप्त केल्याची माहिती आहे. सोबतच विशालचे कार्य़ालय आणि घर देखील पोलिसांनी आता सील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध बँकेतील त्याची खाती पत्र देऊन गोठवण्यात आली आहे.
कोण आहे विशाल फटे?
विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याची माहिती
सध्या बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता
बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते
मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा
अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक
विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक
फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक
NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा
2019 पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यातील काही जणांना 28 टक्के परतावा दिला
मागील तीन महिन्यात अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली
काही दिवसांपूर्वी 10 लाख गुंतवल्यास वर्षाला 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले
27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली
9 जानेवारीपासून फोन बंद असून, बार्शीतून गायब झाल्याची तक्रार
इतर महत्वाच्या बातम्या
Solapur, Barshi : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोटींच्या 'स्कॅम'मुळं खळबळ , मुख्य आरोपी विशाल फटे फरार