बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या 'फटे'ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. त्याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. 


या प्रकरणात  विशाल फटेसह पाच जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र कुणी गुन्हा दाखल करायला समोर येत नव्हते. आज अखेर दिपक अंबारे यांनी विशाल फटेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तो शेअर्स मार्केटमध्ये विशाल फटे पैसे गुंतवायचा. शेअर्स मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवत होता.  विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्सीयल सर्व्हिसेस या कंपन्या त्यानं चालू केल्या होत्या.  या कंपनी मार्फत त्याने शेअर्समध्ये वेगवेगळया कंपन्यांमध्ये बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा वरील कंपन्यांच्या खात्यामध्ये घेतल्या, असं अंबारे यांनी म्हटलं आहे. 


आकर्षक परतावा देण्याचे आमिष, व्यवहाराबाबत मात्र माहिती नाही
पैशांच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता. तो काही लोकांकडून आर.टी.जी.एस. मार्फत किंवा चेकमार्फत किंवा रोख रक्कम घेऊन त्याच्या वरील कंपन्यामार्फतीने व्यवहार करायचा. त्याचा व्यवहार कोणत्या पध्दतीने चालू आहे हे तो कोणास सांगत नसे. फक्त काही वेळेस कोणाला रोख रक्कम दयायची असल्यास माझे एच.डी.एफ.सी. च्या खात्यामध्ये रक्कम जमा करत असे, ती रक्कम मी काढून त्यास ऑफिसला नेवून देत होतो, असं अंबारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 


तक्रारीत नेमकं काय म्हटलंय...
शेअर्स मार्केटमध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करुन जास्त नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून मला त्याने त्याच्या कंपनीमध्ये माझी व माझ्या पाहुण्यांची रक्कम गुंतवण्यास विश्वासाने भाग पाडले. विशाल फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स मार्केट मधील आय.पी.ओ. ग्रे मार्केट मध्ये गुंतवणूक करीत आहे असे सांगत असे. आय.पी.ओ. महिन्यातून 2 ते 3 वेळा असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असल्याबाबतची शेअर्स मार्केट मधील अल्गो ट्रेडींग ही नवीन संकल्पना त्याने तयार करुन या ट्रेडींग बद्दल त्याचा भरपूर अभ्यास असल्याचा भासवून त्याने मला माझे नातेवाईकांना तसेच मित्रांना व बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात त्याचे वरील कंपनीमध्ये पैसे गुंतविले होते.  विशाल अंबादास फटे यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे व त्याच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडून मी माझे स्वत:चे, माझ्या स्वत:च्या सख्या भावाचे व माझ्या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले. 


अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा
या प्रकरणी अंबारे यांच्या तक्रारीनंतर विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे , अलका अंबादास फटे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ अंबादे यांनी तक्रार केली असली तरी या प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. बार्शी तालुक्यात फसवणुकीचा आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा देखील काही पोस्टमधून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी बडे नेते, अधिकारी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं लोकांना सांगायचा. त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून लोकांना तशी खात्री करुन द्यायचा, अशी माहिती देखील आहे.


तीन महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याचे आमिष


विशाल फटे हा बार्शीत शेअर ट्रेडिंग कंपनी चालवत होता. सुरुवातीला त्याने कंपनीच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले. आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवुन कोट्यवधी रुपये फटे यांच्याकडे गुंतवणूकिसाठी दिले होते. मात्र मागील काही दिवसांपासून फटे याचा मोबाईल बंद आहे. बार्शीतल्या घरी कोणीही नाहीये तर बार्शीतल्या उपळाई रोडवर असलेल्या कार्यालयाला देखील कुलूप आहे. त्यामुळे फटे पसार झाल्याच्या चर्चा मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू होत्या. 


अनेक नेते उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजकांसोबत फोटो दाखवून लोकांना भुरळ


अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, नामवंत व्यक्ती अशा अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या फटेकडे केली होती अशी चर्चा आहे. हा आकडा दोनशे कोटींहून अधिकचा असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र आता या क्षणाला किती आकडा आहे हे संगणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली. मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या या चर्चाबाबत कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. मात्र अखेर काल दीपक बाबासाहेब अंधारे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार 5 कोटी 63लाख 25 हजार रुपयांची फसवणूक या व्यक्तींची झाली आहे. मात्र हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक उच्च पदस्थ अधिकारी, उद्योजक यांच्यासोबत काढलेले फोटो दाखवून विशाल फटे लोकांना भुरळ पाडत होता. मोठा परतावा देण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक जणांनी कर्ज काढून, जमीन, सोने गहाण ठेवून पैसे गुंतवल्याची माहिती आहे. विशालकडे ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती. अशांनी पुढे येऊन पोलिसांकडे फिर्याद द्यावे असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. 



कोण आहे विशाल फटे?



विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याची माहिती 


सध्या बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता


बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते


मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा


अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक


विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक


फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक


NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा


2019 पासून बार्शीत त्याने अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली, त्यातील काही जणांना 28 टक्के परतावा दिला


मागील तीन महिन्यात अनेकांनी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली


काही दिवसांपूर्वी 10 लाख गुंतवल्यास वर्षाला 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले


27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली


9 जानेवारीपासून फोन बंद असून, बार्शीतून गायब झाल्याची तक्रार