Majha Impact : वडिलांच्या उपचाराकरिता मॅरेथॉन धावणाऱ्या पारनेरच्या तीन बहिणींच्या संघर्षाची कहाणी एबीपी माझानं दाखवली आणि माजी खासदार दत्ता मेघे यांनी या मुलींना मदतीचा हात दिला आहे. दत्ता मेघे यांनी या भंडारी कुटुंबीयांना लागणाऱ्या वर्षभराच्या खर्चासाठी मदतीचा धनादेश तातडीनं दिला आहे. एवढंच नाही तर संघर्ष करणाऱ्या या तीन बहिणींपैकी दोन मोठ्या बहिणींना नोकरी देण्याची घोषणाही त्यांनी केली. तीन महिन्यात त्यांनी अर्ज द्यावा, त्यांना तातडीनं नोकरी देऊ, असं आश्वासन दत्ता मेघे यांनी दिलं आहे. 


शीतल, भाग्यश्री आणि साक्षी भंडारी अशी या तीन जिगरबाज लेकींची नावं आहेत.  प्रत्येक धावपटूचं अंतिम ध्येय ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं असतं. पण या तीन बहिणींची कहाणी मात्र वेगळी आहे. यांना धावायचंय ते फक्त आपल्या वडिलांसाठी. पारनेर तालुक्यातल्या आळकुटी या छोट्याशा गावात भंडारी कुटुंब राहतं. घरात या तीन बहिणी, आई-वडील आणि एक भाऊ. 


पण गेल्या 15 वर्षांपासून भंडारी कुटुंबातला कर्ता पुरुष अंथरुणाला खिळून आहे. म्हणूनच या बहिणी घर चालवण्यासाठी देशभरातल्या स्पर्धांमध्ये धावत आहेत. सगळ्यात मोठी शीतल बीएच्या शेवटच्या वर्षात आहे. भाग्यश्री ज्युनियर कॉलेजमध्ये तर साक्षी दहावीत शिकतेय. पण शिक्षणाबरोबरच घरखर्च चालवण्यासाठी या तिघी बहिणी लहानपणापासून धावण्याचा सराव करत आहेत.
 
शीतलनं तेलंगणा, भुवनेश्वर, कर्नाटकमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि राज्यभरातल्या मॅरेथॉन आणि क्रॉस कंट्री स्पर्धेत घवघवीत यश मिळवलंय. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत लहान दोघींनीही राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलीय. 


या बहिणींना ज्यावेळी राज्याच्या बाहेर स्पर्धेच्या निमित्तानं जावं लागतं त्यावेळी अनेकदा पैशांची अडचण भासते. अशावेळी ती गरज भागवण्यासाठी अशावेळी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणं, घरकाम करणं अशी कामही या मुलींना करावी लागतात. 


कधी कधी गुणवत्ता असून  परिस्थिती मुळे जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो याचं हे उदाहरण एबीपी माझानं सर्वांसमक्ष ठेवलं. या बातमीची दखल माजी खासदार दत्ता मेघे यांनी घेतली आहे. मेघे यांनी या भंडारी कुटुंबीयांना लागणाऱ्या वर्षभराच्या खर्चासाठी मदतीचा धनादेश तातडीनं दिला आहे. एवढंच नाही तर संघर्ष करणाऱ्या या तीन बहिणींपैकी दोन मोठ्या बहिणींना नोकरी देण्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळं भंडारी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


दत्ता मेघेंकडून आधीही अनेकांना मदतीचा हात
दत्ता मेघे यांनी याआधीही जबलपूरच्या एका भाऊ बहिणीला मदत केली होती. या दोघांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याची बातमी होती की आम्हाला शिक्षण घेता येत नाहीये, आत्महत्या करू द्या. मेघे यांनी त्या दोघांचे शिक्षणाचा 10 वर्ष खर्च उचलला. आता बहिणीचे लग्न करून दिले आणि त्या मुलाला 36000 महिन्याची नोकरी स्वत:च्या कॉलेजमध्ये तर दिली शिवाय तो आता पुढचे नर्सिंगचे शिक्षणही त्यांच्याच कॉलेजला मोफत करतो आहे.  तसेच कचऱ्यात एका दिवसाची मुलगी कोणीतरी फेकून गेले होते. या गोष्टीला 14 वर्ष झाली. त्या मुलीला भावाकडे दत्तक दिले आणि तिचा पूर्ण खर्च केला. ती व्यवस्थित शिकते आहे, डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे. त्या मुलीची रीतसर दत्तक प्रक्रिया केली. ते एक संस्था चालवतात जिथे अनाथ बालके आणून, त्यांचे राहणे, खाणे, शिक्षण आणि मग त्यांच्याच संस्थांमध्ये नोकरी दिली जाते. त्यातून 36 मुले त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन कामाला लागली आहेत.