सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला जाण्यासाठी प्रमुख केंद्र म्हणजे बार्शी. पण बार्शीमार्गे मराठवाड्यात जाण्याचा हा मार्ग चांगलाच खडतर बनला आहे. या मार्गावरच्या खड्ड्यांनी वाहनचालकांना अक्षरशः जेरीस आणलं आहे. या रस्त्यावर अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. हा रस्ता जणू मृत्यूचा महामार्ग बनला आहे. गेली दहा वर्षे बार्शी-कुर्डूवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कसलेच प्रयत्न झाले नाहीत. निवेदनं देऊन थकलेल्या जनतेने अखेर आंदोलनाची हाक दिली.


खरंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही घोषणा केली. पण बार्शी ते कुर्डूवाडी या रस्त्यावरील खड्डे दाखवल्यानंतर सरकारची तिजोरीच रिकामी करण्याची वेळ येईल. कारण इथे रस्त्यात खड्डे नाहीत तर खड्ड्यात रस्ता आहे. बरं हा रस्ता खराब होऊन फक्त वर्ष-दोन वर्षे झाली नाहीत तर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रस्त्याची दूरवस्था आहे. त्यामुळे परिसरातील डझनभर ग्राम पंचायतींनी एकत्र येऊन लढा उभा केला आहे.

बार्शी-कुर्डूवाडी हे अंतर जेमतेम 34 किलोमीटर. खड्ड्यांमुळे हा प्रवास दोन तासांचा झाला आहे. हे अंतर कापण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुचाकी असो की चारचाकी प्रवाशांचे हाल चुकलेले नाहीच. शासन आणि प्रशासन या रस्त्याकडे वळूनही पाहत नसल्याने अखेर हा प्रश्न जनतेने आपल्या हाती घेतला आहे. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची मालिका चालू ठेवली जाणार आहे. या आंदोलनात बार्शीतल्या सामान्य जनतेसह मार्गावरच्या ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेतला आहे.



बार्शी ते कुर्डूवाडी मार्गावर एकूण 12 ग्रामपंचायती येतात. या रस्त्याची अवस्था पाहण्यासाठी बार्शीतल्या सामान्य  जनतेने एक सर्वेक्षण केलं. त्यानंतर बार्शी आणि कुर्डूवाडीसह या मार्गावरच्या सर्व गावांना एकत्रित करून व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. ज्याची सुरुवात गुरुवारपासून (14 सप्टेंबर) झाली. बार्शी तहसीलसमोर निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलनाचा श्रीगणेशा झाला. सामान्य जनतेने उभा केलेला हा लढा पहिल्याच दिवसापासून परिणामकारक होत आहे.

या आंदोलनाला सहजीवन सेवाभावी संस्था, दलित महासंघ, मराठा सेवा संघ, सोलापूर जिल्हा नगरपालिका कर्मचारी संघ, प्रहार जनशक्ती,  लायन्स क्लब, वकील संघ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छावा संघटना, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, शिवस्पर्श प्रतिष्ठान, पत्रकार सुरक्षा समिती, सरपंच संघटना सर्व राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय. सर्वसमावेशक लढा उभारल्याने अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. यानिमित्ताने जनतेने एकत्रित येऊन हाती घेतलेले प्रश्न कसे दखलपात्र होतात हे अधोरेखित झालं आहे.

या आंदोलनानंतर सरकारला जाग येईल. खड्डेमुक्त आणि चकचकीत रस्ता बनवलाही जाईल. पण तो किती दिवस टिकेल हा प्रश्नच आहे.  कारण यापूर्वीही या रस्त्यावर मलमपट्टी झाली. पण रस्त्याचं फाऊंडेशनच चुकीचं आहे. त्यामुळे वारंवार रस्ता खड्ड्यात जात आहे. डिसेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करणारं बांधकाम विभाग यावर उपाय शोधणार का हा प्रश्नच आहे.

पाहा व्हिडीओ