सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनाचा मानबिंदू असलेला आंबोलीचा धबधबा पुन्हा चर्चेत आला आहे.
दोन गावांच्या सीमावादावरुन या धबधब्याचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कारण ठरलंय ते करातून जमा होणारी मोठी रक्कम.
आंबोलीचा धबधबा हा पारपोली गावाच्या हद्दीत येतो. मात्र या धबधब्याला आंबोली गावाचं नाव आहे. हा धबधबा आपल्याच हद्दीत आहे असा दोन्ही गावांचा दावा आहे.
गेल्या वर्षीपासून आंबोली आणि पारपोली या दोन ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या त्यांच्या हद्दीत पर्यटन कर वसूल करण्यास परवानगी दिली.
त्यानुसार पारपोली ग्राम पंचायतीने मुख्य धबधब्याजवळ करवसुली केली. त्यातून सुमारे 10 ते 11 लाख रुपये जमा झाले. याच रकमेमुळे वादाला तोंड फुटलं.
पारपोली ग्राम पंचायतीने या धबधब्याचं नाव स्वत:च्या गावावरुन ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या.
त्यासाठी गोपनिय बैठका सुरु आहेत. याला आंबोली ग्रामस्थांचा विरोध असून काही झाले तरी आम्ही नाव बदलू देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
पारपोली गावकऱ्यांनी ‘शिवतीर्थ धबधबा पारपोली’ असं नवं नाव सुचवलं आहे.
आंबोली घाटाला आणि येथील वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे ओळख मिळाली आहे. हा धबधबा आता जगाच्या नकाशावर झळकला आहे. त्यामुळे दिवसाकाठी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र यावर्षीपासून आंबोली धबधब्याच्या या विकासात सीमावाद आला आहे.
आंबोली धबधब्याला भेट देणार्या पर्यटकाडून प्रत्येकी दहा रुपये, पर्यटन कर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. या पावसाळ्याच्या अखेरीस त्याठिकाणी नेमण्यात आलेल्या समितीकडे दहा लाखाहून अधिक रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झाली आहे.
येणार्या काळात हा आकडा वाढणार आहे. त्यातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. तो धबधबा आपल्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न आपल्यालाच मिळावे, असा प्रयत्न पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आला आहे.
वनविभाग आणि महसुल विभागाने कागदपत्राच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे, त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
एवढ्यावरच न थांबता थेट या धबधब्याचे नाव ‘शिवतीर्थ धबधबा पारपोली’ असे करण्याच्या प्रयत्न, पारपोली गावकऱ्यांनी केला आहे.
दोन गावांचा वाद, आंबोली धबधब्याचं नाव बदलण्याच्या हालचाली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2017 12:52 PM (IST)
आंबोलीचा धबधबा हा पारपोली गावाच्या हद्दीत येतो. मात्र या धबधब्याला आंबोली गावाचं नाव आहे. हा धबधबा आपल्याच हद्दीत आहे असा दोन्ही गावांचा दावा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -