सोलापुरात बेकरी चालकाची हत्या, मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी इथल्या बेकरी चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढचं नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वाहनासह जाळला.
सोलापूर : सोलापूरच्या माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा-उजवा कालव्याच्या साईटपट्टीला ही घटना घडली. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय मारुती काळे (वय 50 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संजय काळे हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय काळे हे शनिवारी (25 जुलै) रात्री जेवण करुन आपल्या घराच्या अंगणात झोपले होते. शनिवारी मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान ते आपले मालवाहतूक वाहन घेऊन, घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले होते.
त्यानंतर सकाळी ते घरात नसल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. तसंच त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय त्यांचं वाहनही घरासमोर दिसलं नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. रविवारी (26 जुलै) शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आलं. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहही दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.
शरीराचे छातीपासून थोडावरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपस सुरु केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.