सांगली : 'गोगलगाय अन पोटात पाय' ही म्हण सर्वांना माहीत असेल. खरोखरच या गोगलगायी आता शेतकऱ्यांना घातक ठरू लागल्या असून 'गोगलगाय अन् पिकांवर पाय' अशी गत होऊन बसली आहे. मिरज पूर्व भागात लहान पिकांची रोपे खाऊन लाखो रुपयांचे नुकसान करीत असून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक औषधांचा भुर्दंड सुद्धा बळीराजाच्या उरावर बसू लागला आहे. त्यामुळे गरीब दिसणाऱ्या गोगलगायीची एक दहशत आता पूर्व भागातील सर्वच गावांसोबत सध्या लिंगनूर, शिपुर, सलगरे व चाबुकस्वारवाडी या गावात तयार झाली आहे.
मिरज पूर्व भागात पायाप्पाचीवाडी ते एरंडोली, टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी भागात मागील चार वर्षांपासून मोठ्या शंखी गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे. तर आता सलगरे, चाबुकस्वारवाडी, शिपुर, व्यंकोचीवाडी, बेळंकी, गायकवाडवाडी या भागात लहान शंख असणाऱ्या आणि शंख सोडलेल्या दुसऱ्या प्रकारातील गोगलगायी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्याही पिकांवर हल्ला करू लागल्या आहेत. पूर्व भागात हे संकट ढबू मिरची, इंडस, लांबडी मिरची, पावटासह सर्व नवीन लागण केलेल्या सर्व रोपांवर वाढले आहे.
सध्या सलगरे चाबुकस्वारवाडी भागातील ढबु मिरची, टोमॅटो, लांबडी मिरची या लहान लावलेल्या रोपांवर त्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करू लागल्या आहेत. लहान रोपे मुळात तोडून, खरवडून व कातरुन टाकतात. सायंकाळी ते रात्रभर आणि सकाळपर्यंत त्या जास्त सक्रिय होत आहेत. पूर्व भागातील एक दोन गावात पहिल्या वर्षी सुरू झालेली ही गोगलगायीची समस्या आता दोन वेगवेगळ्या रुपात हातपाय पसरू लागली आहे. एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी भागात असणाऱ्या मोठ्या शांखी गोगलगायी आहेत.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सध्या लहान आकाराच्या गोगलगायी सुद्धा पूर्व भागातील शिवारात वाढू आणि पसरू लागल्या आहेत. आपल्या धारधार दातांनी देठ, पाने कुरतडणे, खाणे यामुळे सर्व पिकांचे नुकसान होत आहे. सलगरे येथील एका शेतकऱ्याच्या प्लॉटमधील 70 टक्के रोपे खाऊन तोडून निकामी केली आहेत. 17 हजार रोपांपैकी 13 हजार रोपे रात्रीत कातरुन नुकसान केले आहे. सुमारे अडीच रुपयांचे रोप गृहीत धरल्यास तीस हजार रुपयांचे नुकसान रात्रीत झाले आहे. त्यामुळे आता अनेकांनी सावध होत गोगलगायीचे औषध ठेऊन नियंत्रण केले आहे. एकूणच वाढता रोपांचा व औषधांचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यंदा पाऊस दोन आठवड्यापासून कमी अधिक प्रमाणात सुरू झाला आहे.
गोगलगायी हातपाय पसरतायेत
जुलैअखेर या गोगलगायी सुप्तावस्थेत होत्या. मागील दहा दिवसात पाऊस सक्रिय होताच ढगाळ हवामानात त्या आता सुप्तावस्थेतून बाहेर पडू लागल्या आहेत. कडक ऊन पडले तरच त्यांची हालचाल व उत्पत्ती कमी होते. सतत कडक ऊन काही दिवस पडल्यानंतर त्या मरतात. पण तोपर्यंत त्यांचे वेगाने प्रजनन आणि अंडी घालणे सुरुच राहते. मागील आठवडा सूर्यप्रकाश पडला नाही. कडक ऊन पडले नाही. त्यामुळे त्या मोठ्या संख्येने पूर्व भागातील शिवारात परिसरात दिसू लागल्या आहेत. गोगलगायी नियंत्रण ठेवण्यासाठी स्नेलकिल औषध आहे. मात्र, ते महागडे आहे. त्यामुळे ते औषध पोहे व चिरमुरे यात मिसळून रोपाच्या मुळाशी टाकले असता सकाळी मेलेल्या गोगलगायीचा खच रोपांच्या मुळाशी व आसपास दिसत आहे. एक गोगलगाय एका वेळी 100 ते 125 अंडी घालते. ही अंडी पिवळसर करडे रंगाच्या असून त्यातून पावसाळा सुरू होताच शंखासह त्यांच्या पिलांची दिवसागणिक मोठी वाढ होते. उत्पत्ती मोठी असल्याने रोप मोठे अठरा वीस दिवस होईपर्यंत औषध, रोपे, मजुरी यांचा वाढीव खर्च सोसावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या :
सांगलीतील आटपाडीत पावसामुळे घराची भिंत कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
तीन एकरावरील उडदाचं पीक भिजून खराब,बाजारपेठेत जाण्यासाठीचा तयार माल वाया,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू