सांगली : 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लात शहीदांना सहा वर्षीय चिमुकल्याने स्केटिंगद्वारे अनोखी मानवंदना दिली आहे. तसेच सांगली ते कोल्हापूर असं 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करुन ‘स्टॉप टेरेरिझ’चा संदेश देणार आहे.


केदार विजय साळुंखे असे या चिमुकल्याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. आज सकाळी 6.30 वाजता केदारने सांगली येथील शहीद अशोक कामटे चौक विश्रामबाग येथून आपल्या स्केटिंग उपक्रमास सुरुवात केली. यावेळी सांगली पोलीस दलातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26/11 च्या हल्ल्यात शहीदांना मानवंदना देण्यासाठी तसेच स्टॉप टेरेरिझम हा संदेश देण्यासाठी केदारने हे 55 किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करण्याचे धाडस दाखवले आहे.

केदार अंदाजे सकाळी 10.30 पर्यंत कोल्हापूरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचणार आहे. सांगली ते कोल्हापूर 55 किलोमीटरचे अंतर केदार चार तासात पूर्ण करणार आहे. या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड ,नॅशनल  बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाईल्ड  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यामध्ये होणार आहे.