Sindhudurg News : संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी काल (सोमवारी) ही सुनावणी पार पडणार होती. परंतु, गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या निधनानंतर काल राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कालची नितेश राणेंच्या जामीनावरील सुनावणी टळली. 


भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गातील ओरोसहून कोल्हापूरला नेण्यात आलंय. नितेश राणे यांचा पाठीचा आणि मानेचा त्रास वाढल्यानं कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. पोलीस रुग्णवाहिकेतून नितेश राणे कोल्हापूरकडे रवाना झाले होते. या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आलं. त्यामुळे शनिवारी सुनावणी होणार नव्हती, मात्र अखेर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर आता जामीन अर्जावरील उर्वरीत सुनावणी ही सोमवारी पार पडणार होती. शिवाय सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करता, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्या समोरच घ्यावी, असा अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी देखील आज होणं अपेक्षित आहे. 


संतोष परब हल्ला प्रकरण; सर्वोच्च न्यायालयानं संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला


सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी गोट्या सावंत हे संशयित आरोपी आहेत. गोट्या सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, तसेच आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी देखील आहेत. सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला असता तरी देखील 10 दिवसांच संरक्षण दिलं आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र त्यांना या कालावधीत स्वतः दिवाणी न्याया यालयात हजर व्हावं लागेल. 


काय आहे प्रकरण?  


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha