सिंधुदुर्ग : काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने तोतया पोलिसांनी मारलेल्या धाडीचा बनाव समोर आला होता. हे प्रकरण ताजं असतानाच सिंधुदुर्ग पोलिसांनी आता आणखी एक प्रताप केला आहे. कुडाळ पोलिसांनी चक्क आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याला बेकायदेशीरपणे कानडी पोलिसांच्या हवाली केलं. विशेष म्हणजे प्रकरण अंगलट येताच पोलिसांनी त्या दाम्पत्याची सुटकाही केली.

सिंधुदुर्गातील तरुणाने मूळच्या कर्नाटकमधल्या असलेल्या मुलीशी कुडाळामध्ये प्रेमविवाह केला. पाच दिवसांपूर्वीच या दाम्पत्याने लग्न केल्याची नोंद कुडाळ पोलीस स्थाकात केली. दरम्यान शनिवारी कुडाळ पोलिसांसह कर्नाटक पोलीस या दाम्पत्याच्या तेरसे बांबर्डे इथल्या घरी दाखल झाले. मग दोघांना घेऊन कुडाळ पोलीस स्थानकात आले.

कुडाळ पोलिसांनी कायदेशीर लग्न झालेल्या या दाम्पत्याला बेकायदेशीरपणे कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केलं. या नवदाम्पत्याला कर्नाटकात नेऊन मुलीच्या कुटुंबाकडे सोपवण्याचा त्यांचा कट होता. मात्र सतर्क ग्रामस्थांनी हा कट हाणून पाडला. मात्र तरुणाचं कुटुंब आणि ग्रामस्थ पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन कारवाईची मागणी करत आहेत.

मात्र आपण केलेली कारवाई कायदेशीर आणि योग्य प्रक्रियेने केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

खरंतर कायद्याचं रक्षण करणे हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र पोलिसांच्या चुकीमुळे जर सिंधुदुर्गातील या आंतरजातीय दाम्पत्यासोबत ऑनर किलिंगसारखी एखादी घटना घडली असती, तर त्याला जबाबदार पोलिसच राहिले असते. त्यामुळे या बेजबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.