32 लाखांचं कर्ज, होणाऱ्या बायकोसोबतच्या आणाभाका, आई-पप्पा अन् 4 मित्रांचं नाव, शिरीष महाराजांची मनात वादळ निर्माण करणारी सुसाईड नोट!
Shirish Maharaj More Suicide Note : संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. त्याची चार पानांची सुसाईड नोट समोर आली आहे.

Shirish Maharaj More Suicide Note : संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला? असे विचारले जात असतानाच आता त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई-वडील आणि मित्रांच्या नावे लिहिल्या आहेत. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यांमधील मजकूर पाहून त्यांच्या आत्महत्येचे कारण हे आर्थिक विवंचना असावे, असा अंदाज बांधला जात आहे.
शिरीष महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे?
शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी एकूण चार सुसाईड नोट लिहिल्या आहेत. यातील पहिल्या सुसाईड नोटवर त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख आहे. दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या चार मित्रांना आवाहन केले आहे. तिसऱ्या चिठ्ठीत आई-वडील आणि बहिणीचा उल्लेख आहे. तर चौथ्या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला आहे. या चारही चिठ्ठ्यांत त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे.
पहिली सुसाईड नोट
प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो....खरंतर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागमे चूकच आहे. पण कृपा करून आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत हे वडिलांना माहिती आहे, तरीसुद्धा मुंबई सिंगवी-17 लाख रुपये, पचत गट- 4 लाख रुपये, सोने तारण- 2 लाख 25 हजार रुपये, गाडी- 7 लाख रुपये किरकोळ देणेदारी- 80 हजार रुपये आहे.
यातील गाडी विकून ती निल होईल. त्यानंतर 25 लाखांचे कर्ज उरते. तुम्ही सर्वांनी थोडी-थोडी मदत करून आई-वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल मी हे सहज फेडू शकलो असतो. पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा.
आणि हो आमची नवरीबाई.. तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोडा आहे प्रियांका. मला तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पाहा अन्यथा ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो...तुमचा शिऱ्या..
दुसरी सुसाईड नोट
प्रिय बाळा आणि सर्व परिवार....खूप कष्ट करा. आपली इकोसिस्टीम उभी करा. मला माफ करा. थांबू नका. लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे. स्वत:ला जपा. अधून मधून वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इतिकर्तव्यता संपली म्हणून पूर्णविराम देत आहे.
तिसरी सुसाईड नोट
"माझी लाडाची पिनू, प्रियांका...खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही." असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय
यासह, "माझ्या वाईट कालात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय," असंही शिरीष महाराजांनी म्हटलंय.
एवढा काळ थांबलीस, आता...
"कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर... तुझाच अहो.. शिरीष" असंही शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
तिच्यासाठी चांगला मुलगा बघा
यासह मित्रांना उद्देशून लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी प्रियांका यांचे लग्न लावून देण्याचीही विनंती केली आहे. "...आणि हो आमची नवरीबाई. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका. तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो," असंही शिरीष मोरे यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांनी एका चिठ्ठीमध्ये आत्महत्येचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र त्यांनी चिठ्ठ्यांमध्ये कर्जाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सोबतच त्यांनी आयुष्याची इतिकर्तव्यता संपली आहे, समजून पूर्णविराम देत आहे, असं म्हटलंय.
चौथी सुसाईड नोट
प्रिय मम्मी, पप्पा, दीदी...काय लिहू.. वयाच्या 30 वर्षांपर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिले. जे मिळवण्यासाठी कितीतर वर्षे लागतात, ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षांतच मिलवलं. तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलंत. पाठीशी उभे राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. कधी-कधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हारतोच. मिही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा...तुमचाच पप्प्या.... असं शिरीष मोरे यांनी आपल्या शेवटच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
हेही वाचा :
























