यवतमाळ : विदर्भ-मराठवाडाला जोडणारा श्रमसेतू गावकऱ्यांनी एकीच्या बळावर केवळ 15 दिवसांत पैनगंगा नदीवर तयार केला आहे .या भागातील ग्रामस्थांनी लोकसभागाातून लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा श्रमसेतू तयार करण्याची कीमया केली आहे. विदर्भातील पळशी आणि मराठवाडा येथील मनूला या गावाला या पुलाने जोडले आहे. या श्रमसेतुमुळे साधारण 30 गावं जोडली गेली असून 40 किलोमीटरचा फेरा या पुलामुळे वाचला आहे.शिवाय या पूल आणि बंधाऱ्यामुळे नदीपात्रात 3 किलोमीटर पाणी अडविले गेले. त्यामुळे 3 किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला असून या भागातील विहिरींची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दोन्ही काठांवर राहणाऱ्या शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तींना या श्रमसेतुमुळे फायदा झाला आहे.


पूर्वी दोन्ही भागांतील नागरिकांना मोठा फेरा मारून यवतमाळ किंवा नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या गावांत जावे येणे करावे लागायचे. त्यात वेळ आणि पैसा अधिक लागायचा. शाळकरी विद्यार्थी यांना पावसाळ्यात तर पैनगंगा नदीतून पलीकडे असलेल्या शाळेत जाणे शक्य होत नव्हते. अनेकदा गावकऱ्यांनी शासन दरबारात या पूल निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा केला, मात्र काही झाले नाही. या भागांतील सामाजिक कार्यकर्ते चितांगराव कदम यांनी पुढाकार घेत गावकऱ्यांची मोट बांधली श्रमसेतू पूर्ण होईपर्यंत स्वतः नदीच्या पात्रात मुक्काम केला. दिवस रात्र आपल्या गावकऱ्यांच्या सोबतीने श्रमसेतू निर्माण केला. यावेळी ग्रामस्थांनी घरच्या भाकरी खात श्रमदान करीत पैनगंगेवर मजबूत असा श्रमसेतू तयार केला. कुठल्याही शासकीय मदती शिवाय श्रमसेतू (पूल) बांधला गेला. असे मनूला जिल्हा नांदेड येथील सुदर्शन जाधव आणि थुगराव जाधव यांनी सांगितले .



गावकऱ्यांचा उत्साह कायम राखत दिवसभराच्या मेहनतीनंतर रात्री नदीपात्रात भजन कीर्तन केले गेले. शिवाय हा श्रमसेतू पूर्णत्वाकडे जात नाही. तोपर्यंत या जागेतून हलायचे नाही, असा ग्रामस्थांनी निश्चय केला आणि साधारण 15 दिवसात हा श्रमसेतू तयार झाला यासाठी गावकऱ्यांनी 15 लाख लोकवर्गणी जमा केली. सोबतीला मेहनतीची जोड दिली आणि आज हा पूल वाहतुकीसाठी तयार झाला आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीने हा पूल तयार झाला असे सामाजिक कार्यकर्ते चितांगराव कदम यांनी सांगितले.


गावातील सर्व आबालवृद्ध तरुण पिढीने श्रमसेतूसाठी झोकून देऊन काम केले त्यामुळेच हे शक्य झाले, असे पळशी येथील गजानन सोळंके यांनी सांगितले. याच कामाला शासन दरबारी पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षचा कालावधी लागला असता आणि करोडो रुपयांचा खर्च सुध्दा लागला असता मात्र गावकऱ्यांनी श्रमदान करून शिवाय 15 लाख लोकवर्गणीतून हा पूल बांधला. शेतकरी मजूर सर्वांनी यासाठी मेहनत घेतली आज हा श्रमसेतू गावकऱ्यांच्या एकीचे प्रतीक बनला आहे, असे विशाल माने आणि अविनाश खंदारे यांनी सांगितले आहे .श्रमसेतु पूर्ण होण्याच्या शेवटच्या दिवशीं येथे गावकऱ्यांनी साखर वाटून आनंद साजरा केला. त्यामुळे 'गाकरी ते राव न करी' असं या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी पाय रोवून हा पूल श्रमसेतू एकदिलाने उभा केला आहे. त्या गावकऱ्यांच्या एकीच प्रतिक हा श्रमसेतू झाला आहे.