यवतमाळ : नरभक्षक वाघिणी अवनीला ठार करण्यात सहभागी असलेल्या शूटर नवाब शाफत अली खान याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीची पिल्लं सध्या सब अॅडल्ट (10 ते 11 महिने) म्हणजेच शिकण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाघिणीची पिल्लंही नरभक्षक होऊ शकतात, असा दावा शूटर नवाब शाफत अली खान याने केला आहे.


सब अॅडल्ट अवस्थेत वाघाच्या पिल्लांची शिकार करण्याची मानसिकता तयार होत असते. या अवस्थेत अवनी वाघिणीसोबत पिल्लं फिरत होती. या दरम्यान वाघिणीने माणसांची शिकार केली, त्या माणसाना खाल्लं देखील आहे. माणसांना खाल्लाचे पुरावे देखील आहेत. ही बाब चिंताजनक असल्याचं शूटर नवाब शाफत अली खानने सांगितलं.


वाघिणीची पिल्लं शिकार करताना आपल्या आईसोबत असल्याने आणि माणसांना खाल्ल्याने ही पिल्लही नरभक्षक होऊ शकतात. त्यांच्या भविष्यातील वर्तवणुकीतून हे स्पष्ट होईल, असं शूटर नवाब खानने स्पष्ट केलं.


अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनेका गांधी, राज ठाकरे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता.


अवनी वाघिणीला थेट गोळ्या घातल्या?


यवतमाळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली, अशी माहिती वन विभागाने दिली.


मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही, तर तिला थेट गोळ्या घातल्या, असा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे दोन व्यक्तींचं मोबाईल संभाषण असून या व्यक्ती कोण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.


वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं, असा आरोप केला जात आहे.


संबंधित बातम्या



यवतमाळमधील नरभक्षक टी1 वाघीण अखेर ठार

अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप

बिर्ला, अंबानींच्या उद्योगांसाठी अवनी वाघिणीचा बळी : जयंत पाटील

टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका

टी-1 वाघिणीची हत्याच, मनेका गांधींचं मुनगंटीवारांवर शरसंधान

मनेका गांधींच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा: आदित्य ठाकरे