उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी कालपासून (6 नोव्हेंबर) संपावर गेले आहेत. हे कर्मचारी मंदिराची सुरक्षा आणि स्वच्छता करण्याचं काम करतात. संपावर गेलेल्यामध्ये 220 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश आहे.
मुंबईच्या क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नियुक्त केलेले हे कंत्राटी कर्मचारी आहेत. सुट्ट्यांच्या हंगामात हे कर्मचारी संपावर गेल्याने मंदिरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
"गेल्या दोन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. सहा हजार रुपये मासिक वेतन दिलं जातं. पीएफ किती कापून जातो, याची माहिती कंपनी देत नाही. कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी नाही. तुळजा भवानी मंदिर संस्थानने या कंपनीशी केलेला करार आणि कर्मचाऱ्यांना मिळत असलेले मानधन यात तफावत आहे," अशी तक्रार संपकरी कर्मचाऱ्यांची आहे. या विरोधातच त्यांनी संप पुकारला आहे.