गोंदिया : गोंदियात एका महिला कर्मचाऱ्यानं नायब तहसिलदाराला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महात्मा गांधी योजना अनुदानाचं बिल दिवाळी पूर्वी न काढल्यामुळे या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी या महिलेने पायातली चप्पल काढत तहसीलदारांना अक्षरश: झोडलं. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयात ही घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
गोंदियाच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ सालेकसा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी अनेक कामं केली. मात्र दिवाळीआधी नागरिकांना मोबदला न मिळाल्याने महिला कर्मचारी वर्षा वाढई यांनी नायब तहसीलदार आयआर पांडे यांच्याकडे बिल पास करून देण्याची मागणी केली.
मात्र नायब तहसीलदार यांनी महिला कर्मचाऱ्याची मागणी धुडकावून लावत उलट उत्तरे दिली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील भांडण इतकं विकोपाला गेलं की वर्षा वाढई यांनी नायब तहसीलदार पांडे यांना चपलेने मारहाण केली.
नायब तहसीलदार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आणि महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज सालेकसा तहसील कार्यलयासमोरच एक दिवशीय आंदोलन केलं.