एसटीची थकबाकी वेळेवर मिळत नाही, तसंच नियम मोडल्यानंतर होणारे दंड, बँकांची थकलेली देणी, तोटा यामुळे खाजगी कंपन्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. खाजगी शिवशाहींची संख्या आता 576 वरुन 363 झाली आहे. उस्मानाबाद आगारात 4 बसेस आणि तुळजापूर आगारातून आलेल्या 2 बसेस अशा एकूण सहा बसेस उस्मानाबादमधून पुणे मुंबईसह मोठ्या शहरांकडे प्रवासी वाहतूक करत आहे.
सुरुवातीला प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली वातानुकूलित शिवशाही आज लोकांना नकोशी वाटत आहे. कारण ही बस इच्छित स्थळी पोहचण्यास जास्त वेळ लावते आणि भाडेही जास्त आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
शिवशाहीला घरघर लागण्याची कारणं
- नियोजनाचा अभाव
- ठेकेदाराची मनमानी
- अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी असलेले हितसंबंध
- शिवशाही बसेस देखभाल, दुरुस्ती याकडे ठेकेदाराचं होणार दुर्लक्ष
- ठेकेदाराच्या चालकाची मनमानी, कुठेही बस थांबवणे, प्रवाश्यांशी उर्मट भाषेत बोलणे, एसटी कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणे.
जिथं शिवशाही बसची खरोखरच आवश्यकता आहे, त्याठिकाणी शिवशाही बस न सोडणे. जिथं आवश्यकता नाही, तिथं शिवशाही बस सोडणं. प्रवाश्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, अशी विविध कारणं शिवशाही बसला दोनच वर्षात लागलेल्या उतरत्या कळेसाठी कारणीभूत आहेत.
शिवशाही कधी सुरु झाली ?
10 जून 2017 ला मुंबई-रत्नागिरी या मार्गावर एसटीची पहिली शिवशाही सुरु झाली. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एकूण 2 हजार शिवशाही बसेस घेण्यात येणार आहेत. 1850 सीटर बसेस तर 150 स्लीपर (शयनयान) बसेसचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या 500 व 7 खासगी मालकांच्या 500+74 (सीटर+ स्लीपर) अशा 1074 शिवशाही बसेस घेण्यात आल्या. त्यापैकी अरहम या खासगी मालकांच्या 100 पैकी 25 बसेस त्याच्यासह पार्टनर रेनबो या कंपनीने आर्थिक डबघाईस आल्यामुळे काढून घेतल्या. त्यानंतर अरान या कंपनीने आपल्या 100 बसेस सहभागीदारांच्यातील अंतर्गत वादामुळे काढून घेतले आहेत. सध्या भागीरथी या तिसऱ्या खाजगी कंपनीने एसटीला तीन महिन्याची नोटीस दिली आहे. त्यांच्या 88 बसेस काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे खाजगी कंपन्या टप्पाटप्प्यात निघून जात असल्याने, एसटी महामंडळाला नेमके त्यांना कशा पद्धतीने टिकवून ठेवावे, याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दररोज होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे खाजगी कंपन्या शिवशाही सोडून जात आहेत.
एसटी महामंडळाने नव्याने चारशे खाजगी शिवशाही बसेसची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु दोनदा मुदतवाढ देऊनही त्यामध्ये खाजगी बस पुरवठादारांनी रस दाखवला नाही. यावरून एसटीच्या शिवशाहीचं महत्व किती कमी झालंय हे स्पष्ट होतंय.