मुंबई : जगभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. भिवंडीत ईदनिमित्त विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. भिवंडी शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोटरगेट, बागेफिरदोस, दिवानशाह दर्गा मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रातील दुष्काळ लवकरात लवकर दूर व्हावा यासाठी मुस्लीम बांधवांनी दुवा मागितली.
ईदनिमित्त पोलिसांनी कोटरगेट मशीद येथे मुस्लीम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. अखंडता कायम टिकून राहावी यासाठी मुस्लीम बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असं आवाहन पोलिसांनी केलं.
विशेष म्हणजे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात ईद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भिवंडी परिमंडळ - 2 चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ईद-उल-फिद्रतनिमित्त सकाळी कुर्ला रेल्वे स्थानका बाहेर हजारोच्या संख्येत मुस्लीम बांधव एकत्र आले आणि त्यांनी नमाज अदा केली. कुर्ला परिसर दाटीवाटीचा असल्याने मुस्लीम बांधव कुर्ला पूर्वेला असलेल्या स्टेशन समोरील जागेत अर्ध्या तासात शिस्तीत आणि शांततेत नमाज अदा करतात. नमाज अदा करण्याच्या वेळेत बेस्ट बस डेपो बंद करण्यात येतो. प्रवाशांसाठी थोड्या दूरवर बस डेपो हलवला जातो.