मुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा (NTA NEET 2019) निकाल जाहीर झाला आहे. राजस्थानच्या नलिन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर महाराष्ट्रातून सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते, दिशा अग्रवाल अव्वल आले आहेत.


राजस्थानच्या नलीन खंडेलवाल याने 701 गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर तेलंगणाची माधुरी रेड्डी (देशात सातवी) ही मुलींमध्ये पहिली आली. नाशिकचा सार्थक भट हा विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला (देशात सहावा) आला. तर अकोल्याची दिशा अग्रवाल राज्यात मुलींमध्ये अव्वल (देशात 52 वी) ठरली.



सार्थक भट, साईराज माने, सिद्धांत दाते या महाराष्ट्रातील तिघांचा देशातल्या टॉप 50 मध्ये नंबर लागतो. नाशिकच्या सार्थक भटला 720 पैकी 695 गुण मिळाले आहेत. पुढे सार्थकला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असून कार्डिअॅक सर्जन होण्याची इच्छा आहे. सार्थकला आपण टॉप 50 मध्ये येऊ असा विश्वास आधीपासून होता.

सार्थक भट

महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थी

सार्थक भट (नाशिक) रँक -6 (695 गुण)
साईराज माने (सांगली) रँक 34 (686 गुण)
सिद्धांत दाते (जुन्नर, पुणे) रँक 50 (685 गुण)
दिशा अग्रवाल (अकोला) रँक 52 (685 गुण)

दिशा अगरवाल

14 लाख 10 हजार परीक्षार्थींपैकी 7 लाख 97 हजार 42 जण नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत 107 ते 701 या श्रेणीत विद्यार्थ्यांचे गुण आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक 2 लाख 6 हजार 745 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 81 हजार 171 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

ntaneet.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थी आपले गुण पाहू शकतो. परीक्षेच्या उत्तर संचात विद्यार्थी आपली उत्तरं पडताळून पाहू शकतात.