ठाणे : राज्यातील दहा महापालिका निवडणुकीचे निकाल काल हाती आले. काही निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे होते तर काही निकाल आश्चर्यकारक ठरले. काहीसा असाच निकाल ठाण्यात पाहायला मिळाला.
अवघी 21 वर्षांची एक तरुणी शिवसेनेची विजयी उमेदवार ठरली आहे. प्रियांका अविनाश पाटील या ठाणे महापालिकेतील सर्वात लहान नगरसेविका आहेत.
प्रियांका पाटील शिवसेनेतर्फे प्रभाग 24 ब मधून रिंगणात होत्या. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस होती. मात्र प्रियांका पाटील यांचा अडीच हजार मतांनी विजय झाला.
खरंतर प्रियांका पाटील यांना राजकीय वारसा आहे. वडील हे शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत. तर काका ठाण्याचे माजी महापौर होते. परंतु तीन अपत्य असल्याने तिचे वडिलांना निवडणूक लढवू शकले नाहीत. त्यामुळे प्रियांका पाटील यांना तिकीट देण्यात आलं.
दरम्यान, प्रियांका पाटील या डोंबिवलीतील जोंधळे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत.