नागपूर: मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय दिसत नाही, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं. ते एबीपी माझाशी बोलत होते. गडकरी म्हणाले
, "शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झालं ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा"
महापौर कुणाचा? शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर महापौर कुणाचा असा प्रश्नही गडकरींना विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, "प्रत्येकालाच आपला महापौर असावा असं वाटतं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मॅच्युअर आहेत, ते योग्य निर्णय घेतील. कारण शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत"
सामनाची भूमिका अयोग्य दुसरीकडे शिवसेना हा मित्रपक्ष असला तरी सामनातील भूमिका योग्य नसल्याचं गडकरी म्हणाले. भाजप आणि शिवसेना हे वेगळे पक्ष आहेत. दोघांना आप-आपली मतं आहेत. मात्र मित्रपक्षाबाबत सातत्याने अपमानित होणारं लिखाण 'सामना'तून छापणं योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत सातत्याने आक्षेपार्ह लिखाण केलं जातं, ते थांबायला हवं, असं गडकरी म्हणाले.
तसंच भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विजय मिळवला हा शिवसेना आणि 'सामना'चा आरोप चुकीचा असल्याचंही गडकरींनी नमूद केलं.
निकाल काहीही असला तरी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा, असाही सल्ला त्यांनी दिला. शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण होण्यासाठी सामनाच जबाबदार आहे. त्यामुळे मैत्री ठेवायची असेल तर जबाबदारीने लिहावं लागेल. पंतप्रधान, आणि भाजप अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह लिहिणं टाळावं, असं गडकरी म्हणाले.
संबंधित बातम्या