मुंबई : जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. राज ठाकरे यांनी आधी गुजरातचं कौतुक केलं, आता यूपीचे करत आहेत असंही ते म्हणाले.


जयंत पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्रात राज ठाकरेंचे बंधू मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत. आधी त्यांनी गुजरातचे कौतुक केलं, आता यूपीचे करत आहेत. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते त्या राज्यांचा दौरा करतीलच. कोणाला सभा करायची तर त्यावर बंदी करण्याची गरज नाही. 


योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या धार्मिक भोंग्यांवरील कारवाईवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी एखादी गोष्ट केली म्हणजे आपण केली पाहिजे असं नाही. शब्दांच्या कोट्या विरोधी पक्षांना कराव्या लागतात


भारतात महागाई प्रचंड वाढली आहे, महागाईमुळे श्रीलंकेत काय झालं हे दिसलं. केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, ते राज्याला दोष देत आहे असं जयंत पाटील म्हणाले. 


भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेवर ते म्हणाले की, अशी कधी चर्चा झाली नव्हती. आमची काँग्रेस बरोबर आघाडी होती. आमच्या बरोबर भाजपने चर्चा का केली असेल? त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. या हवेतील गप्पा आहेत. भाजप सत्तेत असताना, शिवसेना बरोबर असताना भाजपने आमच्याशी चर्चा का केली असेल?