Beed News Update : स्वच्छता करताना जेसीबीकडून भिंत पडून काल बीडमधील माजलगाव येथील चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. जेसीबी चालकाच्या चुकीमुळे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आज नातेवाईकांनी प्रेत पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर सय्यद निसार सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी विशाल भोसले,स्वच्छता प्रमुख जगदीश जाधवर,जेसीबी चालक महादेव आण्णासाहेब जाधव, स्वच्छता ठेकेदार, जेसीबी मालक अशा पाच जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईद निमित्त नगरपालिकेकडून माजलगाव शहरातील मशिद  परिसराची स्वच्छता चालू असताना भिंत कोसळून सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी घडली होती. या घटनेत सय्यद ईकरा  सय्यद निसार हिचा मृत्यू झाला आहे. 


या घटनेनंतर मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेला जेसीबी चालकावर 302 चा गुन्हा दाखल करावा यासाठी या मुलीचे नातेवाईक आणि नागरिकांनी मुलीचा मृतदेह माजलगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत जेसीबी चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली होती. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी,स्वच्छता प्रमुख ,जेसीबी चालक, स्वच्छता ठेकेदार आणि जेसीबी मालक अशा पाच जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माजलगाव शहरात इदगा मोहल्ला आहे. याच मोहल्ल्यात एक मोठी मशिद आहे. या मशिद परिसरात स्वच्छता करण्यात येत होती. यावेळी स्वच्छतेसाठी आणलेला नगरपालिकेचा जेसीबी परिसरात जात नसताना देखील जबरदस्तीने आतमध्ये घालण्यात आला. जेसीबी मशिदीसमोरील भागातील भिंतीजवळ गेली असता धक्का लागून भिंत कोसळली. यावेळी सय्यद या परिसरातून जात होती. ही भिंत तिच्या अंगावर कोसळली. सय्यद भिंतीखाली दबल्याचे चालकाच्या देखील लक्षात आले नाही. त्याने जेसीबीच्या खोऱ्याने पडलेली भिंत बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जेसीबीचे खोरे मुलीला लागल्यामुळे ती गंभीर जखमी  झाली. ही बाब लक्षात येताच जेसीबी चालकाने तेथून पळ काढला. चालक का पळत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सय्यदचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.


या घटनेनंतर नागरिकांनी जेसीबीवर दगडफेक केली होती. चालक जेसीबी तेथेच सोडून पळून गेला होता. या जेसीबीचा चालक नवीन होता. त्यामुळेच त्याच्याकडून ही घटना घडल्याचे परिसरातून बोलले जात आहे.  दरम्यान, या प्रकरणी मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे बंधू जेसीबी मालक भाऊ श्रीरंग भोसले याला माजलगाव पोलिसांनी परांडा तालुक्यातून अटक केली आहे.


  महत्वाच्या बातम्या


भिंत अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, बीडमधील माजलगामधील घटना