मुंबई :  येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात  उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर लगेच आठवड्याभरातच पुणे आणि औरंगाबाद या दोन सभा जाहीर करण्यात आल्या आहे. महत्वाचं म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे  रोजी औरंगाबादमध्ये  ज्या मैदानात सभा घेणार आहे. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे


औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानात होणार आहे. याच मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. हे इतर मैदानासारखं मैदान असलं तरी या मैदानावर सभेचा इतिहास आहे . बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभा याचं मैदानावर झाल्या. आजवरच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे नंतर हे मैदान कोणाच्याही सभेला भरलं नाही. याच मैदानावर बाळासाहेबांनी औरंगाबादच नाव संभाजीनगर करा ही पहिली घोषणा केली होती.  2005 मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेदरम्यान अजान झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अजानला जोरदार विरोध केला होता. आतपर्यंत शिवसेनेला या मैदानात यश मिळाले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या  सभेत उद्धव ठाकरे या सर्व टीकेचा आणि विरोधकांचा समाचार या ऐतिहासिक मैदानावर कसा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यावरून राज्य सरकारवरही टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभा केले आहेत. आता या सर्व टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. .


महाविकास आघाडीची 30 एप्रिलला निर्धार सभा


महाविकास आघाडीकडून पुण्यात 30  एप्रिलला संध्याकाळी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलंय.  पुण्यातील अलका चौकात ही निर्धार सभा संध्याकाळी होणार आहे.  या सभेला राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत.  कॉंग्रेसकडून मंत्री यशोमती ठाकूर सहभागी होणार आहेत तर शिवसेनेकडून राज्याच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला आमंत्रण देण्यात येणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीत सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलंय.