Uddhav Thackeray : मनसे आणि भाजपचं हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. याबरोबरच बाबरी मशीद पडली त्यावेळी राज ठाकरे कुठे होते? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्य बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले. सध्या राज्यात विविध विषयांवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे याच तापलेल्या राजकीय वातावरणात जशास तसे उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. याबरोबरच भाजपवर तुटुन पडा, त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजप आणि मनसे यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे जनतेला दाखवा, आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकींमागून बैठकींचा सपाटाच लावला आहे. आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर उद्या जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांना ॲानलाईन मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे इतर नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर लगेच आठवड्याभरातच पुणे आणि औरंगाबाद या दोन सभा जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ज्या मैदानात सभा घेणार आहेत. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या