मुंबई: मार्मिकच्या दिवाळी अंकातील (Marmik Diwali Ank) अग्रलेखातून मोदी सरकार (Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) ताशेरे ओढण्यात आलेत. लोकशाहीच्या बुरख्याआड हुकूमशाहीचा भेसूर चेहरा दडलाय, तो आता अक्राळविक्राळ रूप धारण करतोय अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे. भाजप या मित्रपक्षावर आम्ही विश्वास टाकला, मात्र त्यांनी मित्रपक्ष नुसता फोडला नाही तर पळवून नेण्याचा प्रयत्न केला अशी टीका मार्मिकने केली आहे.
काय लिहिलंय मार्मिकच्या संपादकीयमध्ये?
आकाशकंदील बदलण्याची वेळ झाली
उठा उठा दिवाळी आली, असं म्हटलं की आजवर त्याच्यापुढे फटाके वाजवण्याची वेळ झाली. फराळ खाण्याची वेळ झाली' इथपासून 'अमुक सावणाने अंघोळ करण्याची वेळ झाली' इथपर्यंत काही ना काही जोड दिली जात होती... यंदाची दिवाळी मात्र वेगळी आहे... हा दिव्यांनी आसमंत उजळण्याचा सण... तो आपण साजरा करूच... पण आहे का हो आपल्या आसपास उत्साहाचा उजेड? काय वातावरण आहे देशात, राज्यात? मळभ दाटल्यासारखी काळोखी साचली आहे... राज्यात तर सगळ्या मोठ्या शहरांमध्ये भकास करणाऱ्या विकासामुळे हवेत प्रदूषणाचं उच्चांकी प्रमाण साकळलं आहे... मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे अस्वस्थता आहे..... देशात बेरोजगारी, महागाई यांचा उच्चांक आहे... पण. सर्वोच्च थापेबाजीत त्याच्याही वर कडी केली जाते आहे... लोकशाही राहते की मोडून पडते, असा प्रश्न पडावा इतकं कुंद, घुसमटवणारं वातावरण बनलेलं आहे... यात कोणी काय शुभेच्छा दयायच्या आणि घ्यायच्या?
नऊ वर्षांपूर्वी देशातील जनतेने मोठ्या विश्वासाने आधीचा, जळमटं घरलेला, उदासवाणा आकाशकंदील बदलून भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली होती... तो आकाशकंदील चायनीज बनावटीचा असावा इतका तकलादू निघाला आणि त्यातून काय उजेड पडतो आहे, ते रोज दिसतंच आहे... मानवी विकासाच्या सगळ्या निर्देशांकांमध्ये देशाची अभूतपूर्व घसरण झालेली आहे आणि आज देशात लोकांचं, लोकांसाठी चालवलेलं. लोकांचं राज्य उरलेलं नाही... लोकशाहीच्या बुरख्याआड हुकूमशाहीचा भेसूर चेहरा दडलेला आहे... तो दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करतो आहे....
भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष आम्ही या मित्रावर नको इतका विश्वास टाकला, हे आता कळतंय... यांना महाराष्ट्रात थारा दिला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी. त्यांच्या आधाराने हा पक्ष मोठा झाला आणि त्याने संधी मिळताच मित्राचा गळा कापला... मित्रपक्ष नुसता फोडला नाही, तर पळवून नेण्याचा प्रयत्न केला... एक बेकायदा सरकार राज्याच्या डोक्यावर आणून बसवलं... आता आपल्या कर्माची फळं भोगतायत... याहून अधिक भोगावी लागतील...
एकवेळ अंधार परवडला पण डोळ्यांमध्ये लेझर लाइटसारखा घुसून डोळ्याचे पडदेच निकामी करणारा हा भयंकर विखारी उजेड नको, अशी अवस्था आज सगळ्याच देशाची होऊन बसली आहे... त्यावर उपाय एकच... हौसेने लावलेला हा आकाशकंदील उतरवा आणि परस्परसामंजस्याचा, सौहार्दाचा मंद प्रकाश पसरवणारा नवा आकाशकंदील लावा... सध्याच्या वातावरणात त्रासलेल्या, गांजलेल्या, थकलेल्या मराठी मनाला विरंगुळा देऊन उभारी आणणारा हास्यडोस देण्याचा प्रयत्न आम्ही या हलक्याफुलक्या साहित्याने आणि व्यंगचित्रांनी भरलेल्या दिवाळी अंकातून केलेला आहे... तो वाचकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे....
सर्व वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ही बातमी वाचा: