जम्मू काश्मीर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation)  महायुतीतच महाभारत सुरू आहे. आरक्षणावरून भुजबळांनी (Chhagan Bhujbal)  घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde)  भुजबळांना दिला आहे. जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.  


मराठा आरक्षणावरून महायुतीत महाभारत


मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू आहे. भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शंभूराज देसाईंनी  हल्लाबोल केला आहे.  तर भुजबळांचं वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीप्रमाणे असल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून समर्थन  देण्यात आले आहे.  समोरून एन्ट्री मिळत नाही तर मागच्या दरवाजातून ओबीसी आरक्षणात शिरण्याचा डाव आहे या भुजबळांच्या वक्तव्याला मंत्री शंभूराज देसाईंनीच विरोध केलाय. भडक वक्तव्य करून वाद निर्माण करण्याची भुजबळांची सवय आहे अशी टीका शंभूराज देसाईंनी केलीय. अजित पवारांनी यात लक्ष घालावं असं आवाहन देसाईंनी केलंय.


मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा, जरांगेचे मराठा नेत्यांना आवाहन


तर दुसरीकडे मनोज जरांगे आक्रमक झाले आहे. मराठा समाजाच्या मुलांसोबत उभे राहण्याचे आवाहन नेत्यांना केले आहे."मी यापूर्वी कधीच आवाहन केले नाही. पण आज मराठा नेत्यांना आवाहन करीत आहे. मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेलं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मी आज सांगत आहे, समाजाने उद्या सांगायला नको अगोदर आम्हाला का सांगितले नाही. तर, जात संपवू देऊ नका मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा, हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही असे आवाहन जरांगे यांनी मराठा नेत्यांना केले आहे.  


पाहा व्हिडीओ:



हे ही वाचा :


बुलंद हौसले दुश्मन के छाती पर तिरंगा गाड के आते थे, LOC वर शिवरायांचा पुतळा; मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण